थोडे व्यावहारिक थोडे स्वार्थी..थोडे व्यवहारी आणि स्वार्थी सुद्धा — “आई, अग ह्यात रडण्यासारखे काय आहे?उलट तुला येथे आराम मिळेल.”बर मी निघतो आता ८ दिवसांनी फोन करीन.”सुरेश असे म्हणून निघून गेला .मागे वळूनही पहिले नाही..शाळेत जाताना रडणारा ,हात आणि पदर घट्ट धरून ठेवणारा हाच का तो सुरेश असा विचार मीना ताईंच्या मनात क्षणभर येऊन गेला.त्याला शाळेत सोडून जाताना मीना ताईंचे डोळेही भरून येत.तो दिसेनासा होईपर्यंत त्या त्याला हात हलवीत उभ्या रहात.सुरेश नंतर महेश चा लगेचच सव्वा वर्षाने जन्म झाला..आवळेजावळेच दिसायचे दोघे.दिवसभर दोघांची उठबस करताना मीनाताई थकून जात.रात्रीही दोघे एकदम झोपली तरच त्याना विश्रांती मिळे…रात्री एक जरी उठला तरी झोपमोड व्हायचीच.दोघे चालायला लागल्यावर त्या दोघांना घेऊन संध्याकाळी बागेत जात.लोक म्हणत काय गोड छोकरे आहेत हो तुमचे…! हसतमुख आणि खेळकर..! काही त्रास नसेल त्यांचा तुम्हाला.!..नसेच..! मुलांचा आईला कसला आला आहे त्रास? एक दिवस त्या अश्याच बागेत बाकावर बसल्या असताना एक सुंदर मध्यमवयीन स्त्री त्यांच्या जवळ आली आणि गोड हसून म्हणाली”मी इथे बसले तर चालेल ना?”तिची साडी, बांगड्या मंगळसूत्र आणि कर्णफुले पाहून त्या श्रीमंत असाव्यात हे मीना ताईंच्या लगेच लक्षात आले.”हो,हो.बसाना.”त्यांनी हसून उत्तर दिले त्या बाईन्च्या मागे बाबागाडीत मुलाला घेऊन आया होती…मुलगाही आई सारखाच एक गोरा भुरका आणि गुटगुटीत होता..”काय नाव आहे तुमच्या मुलाचे?”सचिन. आणि माझे सुप्रिया”त्यांनी गोड हसून सांगितले”…बोलता बोलता कळले कि त्या जवळच्याच tower मध्ये १९व्या मजल्यावर रहात होत्या. नवर्याची बदली झाल्यामुळे त्या अलीकडेच मुंबईत आल्या होत्या.सुप्रिया ताई खूप लाघवी होत्या.मीनाताईंची त्यांच्याशी लगेच गट्टी जमली..पण ती थोड्याच दिवसांची ठरली कारण वर्षभरातच त्यांच्या नवर्याची बदली दिल्लीला झाली आणि त्यांचा सहवास संपला.. मीना ताई चा संसार चार चौघीसारखाच सुरु होता.नवर्याचे ऑफिस .मुलांच्या शाळा, अभ्यास,नंतर कॉलेज ह्यांच्या वेळा सांभाळताना त्यांना दिवस पुरत नसे.मुलांना चांगल्या नोकर्या लागल्या आणि सुना घरात आल्या परंतु त्यांची जबाबदारी जराही कमी झाली नाही..उलट स्वयंपाकाचे काम जास्तच वाढले.कारण दोघी सुना नोकरी करणार्या होत्या.त्यानंतर त्यांच्या यजमानाचे आजारपण सुरु झाले आणि ५/६ महिन्यातच सारे आटपले..मीना ताईना आता मुले असून पोरके झाल्या सारखे वाटू लागले..त्यांच्या फंडाचे पैसे आले ते मुलांनी वडिलांच्या आजारपणात खूप खर्च झाला म्हणून वाटून घेतले..काही दिवसांनी धाकट्याने वेगळा संसार थाटला ,ऑफिसमधून कर्ज काढून आणि सासर्याकडून मदत घेऊन पैश्याची जमवाजमव केली असे आईला सांगितले..परंतु फर्निचर घेण्यासाठी पैशाची जरुरी होती म्हणून आईकडे पैशाची मागणी केली…मीनाताइकडे कुठले पैसे?मग दागिने मोड म्हणाला. ..मोठी सून गप्प बसणार नाही हे जाणून घेऊन मीनताइनि दागिन्यांची वाटणीच करून टाकली.आणि त्या दोघांकडे आळीपाळीने राहू लागल्या…खरे सांगायचे तर ज्याची अडचण असेल तेथे राहू लागल्या.प्रथम,मोठ्या सून बाईंचे बाळंतपण ,मग धाकट्या सून बाईंचे आजारपण मग पुन्हा मोठय सुनेचे दुसरे बाळंतपण ,मग धाकट्या सुनेचे बाळंतपण असे करता करता नातवंडेहि मोठी झाली.शाळेत जाऊ लागली.एक दिवस मोठी सून म्हणाली”आई .मी मुलाना पाळणा घरात ठेवणार आहे…त्याना शाळेत नेणे आणणे तुम्हाला झेपणार नाही..मुले माझ्या बरोबरच निघतील..शाळेत नेण्या आणण्याचे काम त्या मावशीच करणार आहेत..संध्याकाळी आम्ही तिघेही एकदमच परत येऊ..म्हणजे तुम्हाला फक्त स्वयंपाक आणि घरकाम इतकेच करायचे..दुपारी विश्रांतीही मिळेल ना…! “मीनाताई काहीच बोलल्या नाहीत..पण मोठ्या सुनेचा कावा धाकट्या सुनेच्या लगेच लक्षात आला..तिने लगेच सांगून टाकले सासूबाई दोघींकडे ६/६ महिने राहतील. काही वर्षे अशीच गेली..आता मीनाताइना स्वयंपाक/घरकाम करणे जमेना..त्यांचा औषधांचा खर्चही वाढला. एक दिवस मोठा मुलगा म्हणाला ,”आई,आम्ही दोघे दिवसभर बाहेर असतो..मुले होस्टेल वर.तू घरात एकटी…तुला काही अचानक झाले तर काय करशील?महेशकडे सुद्धा हीच अडचण आहे..म्हणून आम्ही असा विचार करतोय कि तू वृद्धाश्रम मध्ये राहणेच योग्य ठरेल तेथे व्यवस्थापकांचे तुझ्याकडे लक्षही राहील.चालेल न?”आता सर्व ठरवल्यावर मला विचारतोयस ,मग मी काय बोलू रे?”मीना ताई इतकेच म्हणाल्या.प्रत्येक मुलाने आळीपाळीने पैसे भरायचे असे ठरले..परंतु पैसे कधीही वेळेवर येत नसत.१० तारीख उलटून गेली कि व्यवस्थापक दरवेळी तगादा लावत. टोमणे मारत खाली मान घालून मीनाताई त्यांचे बोलणे ऐकून घेत.कधी एका पैची उधारी कोणाची त्यानी ठेवली नाही..आता असा अपमान सहन करताना त्यांचे डोळे भरून येण्या आधीच त्या माघारी वळत. असेच ऑफिस मधून परत येताना एक महिला ऑफिस समोरील वडाच्या पारावर बसलेली त्यांना दिसली..दुपारीही त्यांना ती तेथेच बसलेली दिसली ..परंतु संध्याकाळी व्यवस्थापक त्या बाईना घेऊन त्यांच्याच खोलीत आले..मीनाताई ही तुमची नवी मैत्रीण.आजपासून तुमच्याच खोलीत राहील.त्या बाईना अश्रू आवरत नव्हते..त्यांची समजूत घालण्यासाठी मीनाताई त्यांच्या जवळ आल्या आणि एकदम आश्चर्याने म्हणाल्या”तुम्ही सुप्रियाताई तर नव्हे?” “हो ,आणि मला वाटते तुम्ही मीना ताइ,?”बरोबर , पण तुम्ही येथे कश्या?””मलाच कळत नाही आहे अजून..मागच्या महिन्यात माझा मुलगा आणि सून अमेरिकेतून १५ दिवसा साठी आले..खूप आनंदात दिवस गेले..एकदा तो मला म्हणाला आई आता तू आमच्या बरोबरच चल…नको एकटी राहूस..हा flat हि विकून टाकू या..”मी होकार दिला.त्याने एका कागदावर माझी सही घेतली.आणि सर्व व्यवहार पूर्ण केले.घर बंद करून सर्व सामानसुमान घेऊन आम्ही निघालो.मला म्हणाला आता तिकीट मिळेपर्यंत एकाद्या resort मध्ये राहू आणि मग परतू माझ्या घरीं अमेरिकेत.म्हणून आम्ही येथे आलो..येथे पोहोचल्यावर म्हणाला ,”तू इथे बस आम्ही थोडे सामान घेऊन येतो…मी येथे संध्याकाळ पर्यंत त्यांची वाट पहिली…संध्याकाळी ऑफिस मध्ये चौकशी केली तर व्यवस्थापक म्हणाले कि मुलाने येथे पैसे भरून माझी येथेच राहण्याची सोय केली आहे..आता तो परत येणार नाही..दर महिन्याला पैसे पाठवणार आहे.मी त्याच धक्क्यातून अजून आहेर आलेली नाही.”मीनाताइना त्यांची समजुत कशी घालावी तेच समजेना..त्या नुसतेच त्यांच्या पाठीवर थोपटत राहिल्या. ********** हल्ली मुलाना गरज संपली कि वृध्द आईवडील नकोसे का होतात?आजकाल सर्व हवमानच बदलले आहे त्याच प्रमाणे माणसेही बदलली आहेत. .मुले जास्त ,स्वार्थी नि व्यावहारिक झाली आहेत.आता आईवडिलानीही बदलायला हवे.थोडे व्यावहारिक आणि स्वार्थी व्हावयास हवे.आपल्या म्हातारपणीची सोय हातपाय चालत आहेत तोवरच करून ठेवायला हवी.आपला flat/घर /पैसे/दागिने आपण जिवंत आहोत तो पर्यंत आपलेच राहतील हे पहिले पाहिजे.नवर्याच्या मागे तर स्त्रीने जास्तच जा गरूक राहिले पाहिजे.म्हणजे वृद्धापकाळी वृद्धाश्रमात जावे लागले तरी निदान आपला स्वाभिमान तरी गमवावा लागणार नाही. —नीला शरद ठोसर –(30/९/२०१९)

तू असा तू तसा.

तू असा तू तसा…
सकाळचे सहा वाजले आहेत .
तुझा आवाज ऐकू येत नाही आहे.
जरासा थाबला आहेस म्हणू?
कि चालला आहेस म्हणू?
अजूनही अंगण ओले आणि आकाश ढगाळलेले
पाने भिजलेली ..ते पाहून मन निराशा झालेले…..
 
म्हणजे अजून तू रहाणार?आम्हांला अजून धारेवर धरणार?
तू झोडपलेस…बुडवलेस
आमची घरे पाडलीस,
आम्हाला निराधार केलेस
तरी सर्व सहन केले ..
कारण तू तहानलेल्या धरणीला शांत केलेस..
 
गोकुळाष्टमीला तुझी हजेरी असते.
म्हणून कौतुकच केले तुझे..
पण नारळीपौर्णिमेला हि संततधार
तोच जोर,तसाच भडीमार…!
 
मनात म्हटले असुदे.
गणरायाचे स्वागत तुझ्या मनात आहे.
तशीही तुझी तुरळक हजेरी असतेच
१० दिवसात..कधीतरी..!
पण म्हणून असे स्वागत करायचे?
आम्हाला घरा बाहेर पडूही दिले नाहीस
गणेशाला डोळे भरून पाहूही दिले नाहीस..
विसर्जनाच्या मिरवणुकीतही सामील झालो नाही.
गणेशाला चौपाटीवर जाऊन निरोपही दिला नाही.
अजूनही तुझे बरसणे सुरूच आहे..
आमची दैना करणे चालूच आहे..!
 
पण हे काय पाहतेय?
सकाळचे ११ वाजलेले आणि चक्क उन पसरलेले
पाने चमकताहेत ,पांढरे ढग हसताहेत
आणि मधूनच आकाशाचे निळे ठिपकेही दिसत आहेत..
म्हणून च विचारतेय ,
आता जातोयस ना?कि हे आहे मध्यांतर?
हो तसेच आहे तुझ्या मनात खरेतर…!
 
पहा ना,दुपारचे ३ वाजलेत, उन नाहीसे झालेय.
आणि भर दुपारी संध्याकाळ झालीय..
तुझा जोरही वाढलाय…
विजांचा लखलखाट ,ढगांचा गडगडाट..!
तुझी आता सवयच झाली आहे
सरींची सोबत गृहीतच धरली आहे.
आता जायचे तर दसरा दिवाळी करूनच जा.
दिव्यांची रोषणाई पाहून जा.
आणि फराळाची गोडीहि चाखून जा.
–नीला शरद ठोसर–(१८/९/२०१९)