adhantari

अधांतरी —
“हे काय बाबा ?अहो,आज दसरा ना?मग हे काय रोजचेच कपडे घातलेत तुम्ही?बदला बघू ते आधी,आणि मी मागच्या महिन्यात घेतलेला तो नवीन शर्ट घाला.”अग पण…””पण नाही आणि बीण नाही..आज चांगला मुहूर्त आहे घडी मोडायला…घ्या..आणि बदला बघू तो शर्ट..””बर बाई ,घालतो नवीन शर्ट…तुझ्याशी कोण वाद घालणार?”
“बाबा,हल्ली आळशी झालाय हं तुम्ही..परवा संध्याकाळी फिरायला गेला नाहीत,कारण थकवा वाटत होता.काल पण बाहेर गेला नाहीत कारण पाय दुखत होते..आता आजही बाहेर पडायचा मूड दिसत नाही तुमचा?आज काय कारण सांगणार आहात?””हल्ली बाहेर जावेसेच वाटत नाही बघ.! रोज त्याच त्याच रस्त्याने जायचे,त्याच त्याच देवाला नमस्कार करायचा,त्याच त्याच बाकावर बसायचे..कंटाळा आलाय बघ.””बर, मग चला,आज मी येते तुमच्या बरोबर..आज छान बागेत जाऊ.””असे म्हणतेस? चल तर मग,चक्कर मारून येऊ.””बाबा,औषध घेतलेत झोपण्या आधी?रात्री ढास लागली तर मी उठणार नाही हं पाणी द्यायला?””घेतो बाई घेतो. तू म्हणजे आमच्या मारकुटे गुरुजी पेक्षा कडक आहेस.””आता हे कोण नवीन गुरुजी?काल पर्यंत तर मोडक सर होते?” हे ७वीत होते आम्हाला…छान शिकवायचे..पण महा कडक.. रागावले कि डोळे फिरवीत ,हातातली छडी गरा गरा फिरवीत वर्गात फेऱ्या मारायचे.आम्ही समजायचो,आज कोणाला तरी धोपटणार सर…ज्याच्या बेंच जवळ उभे राहत त्याला मार मिळायच्या आधीच तो रडायला लागायचा…”सर ,मारू नका,पुन्हा नाही करणार,”असे आधीच म्हणायचा..तरी एक छडी बसायचीच हातावर…”म्हणून आम्ही त्यांचे नाव मुरकुटे चे मारकुटे केले होते”
*****
“पाहिलेत ना डॉक्टर?हे असे चाललेले असते दिवसभर.! एकट्याशीच बोलतात काय, हसतात काय,पुन्हा पुन्हा शर्ट बदलतात,आराम करत असले कि एकदम उठून ,काठी घेऊन,चपला घालून तरातरा बाहेर जायला निघतात;रात्री औषध दिलेले असले तरी पुन्हा औषध घ्यायला काय उठतात.धड खाणे नाही,पिणे नाही,कोण काय बोलताय तिकडे लक्ष नाही…” आकांक्षाला असे अचानक जाऊन ४ महिने होत आले…पण हे काही त्या दुःखातून सावरत नाहीत…!मला तर दुःख करायलाही सवड नाही,ह्यांच्या काळजीने..दिवसरात्र डोळ्याला डोळा लागत नाही माझा…काही तरी करून ह्यांना ह्या दुःखातून बाहेर काढा डॉक्टर…!
अपघातात गेली असती पोर तरी चालले असते हो…एकदाच रडून घेतले असते..पण सकाळी ऑफिस ला गेलेली पोर संध्याकाळी परत येत नाही..तिचा काहीच ठावठिकाणा पोलिसांना हि लागत नाहीत..ती जिवंत आहे कि नाही माहित नाही,असली तर कुठे असेल,कशी असेल ,असे प्रश्न डोळ्याभोवती फेर धरून नाचू लागतात.. ही शेवट नसलेली आशा जीवाला घोर लावते..आणि ह्या दुःखाचा अंतही करत नाही.
“हे दिवसभर दार उघडे ठेऊन दारात बसून राहतात तिची वाट बघत..फोन वाजला कि धडपडत धावत जाऊन फोन घेतात आणि मग रडायला लागतात.फोन खाली आपटतात.रात्री बेरात्री उठून “आकांक्षा आली आकांक्षा आली”असे म्हणत दार उघडायला जातात.पोरीच्या अश्या अचानक गायब होण्याने वेड लागायची पाळी आलीय हो मला…दर २ दिवसांनी पोलीस ठाण्यावर जायचे आणि निराश होऊन परत यायचे..असे वाटते,ह्यांचा हात हातात घ्यावा आणि एखाद्या गाडी खाली उडी मारावी..म्हणजे संपतील हे आशा निराशेत अधांतरी गटांगळ्या खाण्याचे भोग.. ..पण पुन्हा वाटते,आकांक्षा आली तर?काय करू डॉक्टर,तुम्हीच सांगा…!
—-नीला शरद ठोसर—(१५/१/२०१८)