sanshay–laghukatha

संशय.–लघुकथा.
“आत्या काल एक बाई आल्या होत्या.तुझी चौकशी करत होत्या .मी त्यांना सांगितले कि तू आता मुंबईला असतेस.तर त्यांनी तुझा फोन नंबर मागितला.मी त्यांना सापडत नाही म्हणून सांगितले.आणि तुला फोन केला.”नाशिकचा भाचा फोन वर म्हणाला.”नाव काय सांगितले त्यांनी?”मी विचारले.मला आडनाव नीट कळले नाही पण नाव वासंती सांगितल्याचे आठवते,”भाचा म्हणाला.”महागुंदलकर म्हणल्या का?”मी विचारले.”अग हो,हेच म्हणाल्या.तू कसे ओळखलेस?”भाचा म्हणाला.”अरे होती ती माझ्या ४च्या वर्गात.तिच्या आडनावामुळेच लक्ष्यात राहिले आहे तिचे नाव.”मी म्हटले.”मग देऊ त्यांना तुझा नंबर?त्या संध्याकाळी विचारणार आहेत ,”भाचा म्हणाला.”हो दे”मी भाच्याला म्हटले.
रात्री जेवताना मी ही हकीगत “ह्यांना”सांगितली.”छान !हे नाव तर कधी ऐकले नाही तुझ्या तोंडून ?आठवतोय का तिचा चेहरा आता?आपल्याकडे येईल तेंव्हा ओळखशील का तिला?”ह्यांनी असे विचारले आणि मी घाबरलेच .माझ्या हे लक्ष्यातच आले नाही.४थि तली मैत्रीण..अधे मध्ये कधी भेट गाठ नाही ..आता तिचे वयही ७५ पर्यंत गेलेच असणार …कशी ओळखणार मी तिला?”बालमैत्रीण म्हटल्या बरोबर पाघळलीस तू !आता कोणीही येऊ दे वासंतीचे नाव सांगत.बरोबर एकादा धटिंगण हि असेल.सांगेल माझा मुलगा आहे म्हणून .आणि घरात घुसताच चाकू दाखवेल .मग काय करणार आहोत आपण?”हे म्हणाले आणि हे काय करून बसले मी ह्या विचाराने मला काहीच सुचेना .मग ह्यांनीच भाच्याला फोन लावला पण तो पर्यंत त्याने फोन नंबर त्या बाईला दिला होता.
नंतरचे ४ दिवस जीवाची नुसती घालमेल चालली होती.रविवारी फोन आला.”कोण नीला का?””हो,मीच बोलते आहे”,”अग नीला,मी येतेय बर का तुझ्याकडे आज संध्याकाळी.भेटल्यावर सविस्तर बोलू.मी घाईत आहे आता .ठेवते हं फोन!”आणि फोन बंद झाला.माझ्या हाताला घाम फुटला होता आणि पायातली शक्तीच गेल्या सारखे वाटू लागले.”अहो,आज संध्याकाळी घरीच थांबा हं ..वासंती येणार आहे.”मी ह्यांना म्हटले.”कटवायचेस
न तिला काहीतरी कारण सांगून?हे म्हणाले.”अहो तिने फोन लगेच बंदच केला न ?मला बोलूच नाही दिले ,”मी रडवेली होत म्हटले .
संध्याकाळ झाली तशी मी गोदरेज च्या कपाटाला कुलूप लावले.दाराला कडी आणि शिवाय safety चैन लावली आणि बाल्कनीत येउन उभी राहिले.कुणी आडदांड बाई, पुरुष माणसाला घेऊन आली तर बाहेर च्या बाहेर घेऊन जायचे असे मनात ठरवले.इतक्यात एक किरकोळ बांध्याची माझ्याच वयाची बाई लिफ्ट मध्ये चढताना दिसली .२/३ मिनिटात दारावरची बेल वाजली.मी safety चैन न काढताच कडी काढली आणि दार किलकिले केले.तीच बाई दारात उभी होती.ओळखीचे प्रसन्न हास्य करीत म्हणाली ,”अग नीले,दार तरी उघडशील कि नाही पूर्णपणे?”मी तिला घरात घेतले.बसायला सांगून पाणी दिले.एकीकडे तिचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करीत होते पण व्यर्थ ! त्यामुळे पुढे काय बोलायचे ते सुचत नव्हते.पण तिनेच बोलायला सुरवात केली.ती सांगत असलेल्या बालपणच्या आठवणी माझ्या आठवणीशी अजिबात जुळत नव्हत्या .माझा संशय वाढू लागला.तिचे बोलणे थांबवत मी म्हटले,”कुसुम शिंदे आठवते का ग तुला ?””हो तर !तिच्या वडिलांचे फळांचे दुकान होते तीच न?तिच्यामुळे आपल्याला केळी खायला मिळायची न रोज?असे म्हणून ती मोठ्याने हसू लागली.कुसुमच्या वडिलांचे फळांचे दुकान होते कि नाही हे मला आठवत नव्हते.पण कोणी केळी दिल्याचेही स्मरत नव्हते.इतक्यात वीज चमकावी तसे मला आठवले ,कि वासंतीच्या तोंडावर कांजिण्याचे व्रण होते.तसे मी तिला विचारताच मोठ्याने हसून ती म्हणाली ,”हे काय ?आहेत न?आणि एका जागी नखाने कुरतडून तिने एक व्रण दाखवला.आणि म्हणाली,”माझे वडील आर्मी त होते.एकदा काही दिवस आम्ही दिल्लीला राहत होतो.तेथल्या बायकांकडून ही युक्ती शिकून घेतली.नाशिक सोडल्यानंतर आम्ही मुंबईला आलो.मी सेंट कोलंबा मध्ये ५वि पासून १० वि पर्यंत होते.”हो का?मग शिरवाडकर बाई होत्या कि नाही तुला शिकवायला ?मी विचारले.”हो तर .त्यांचा एक पाय थोडासा अधू होता त्याच न?पण इंग्लिश छान शिकवायच्या हं?खूप प्रेमळ होत्या.”वासंती असे म्हणाली आणि माझे मन मला खाऊ लागले तिचा संशय घेतल्याबद्दल.ती वासंतीच आहे अशी माझी खात्रीच झाली कारण t ज्या शिरवाडकर बाईबद्दल ती बोलत होती त्या आमच्या मित्राची बायकोच होती.
“नीले मी निघते आता .माझ्या M r चे अपघाती निधन झाल्यापासून मी नाशिकलाच राहते माझ्या मुलीकडे! नाशिकला आलीस कि भेट हो?पत्ता दिलाय ,नीट जपून ठेव ” ती म्हणाली.ती गेली आणि मला रुखरुख लागून राहिली.किती प्रेमाने पत्ता शोधत भेटायला आली होती.किती भरभरून बोलत होती आणि माझ्या मानगुटीवर संशय पिशाच्य स्वार झाले होते .नीट बोललेही नाही तिच्याशी.अशी कशी वागले मी?मनातल्या मनात १०० वेळा मी वासंतीची माफी मागितली.माझा उतरलेला चेहरा पाहून हे काय समजायचे ते समजले अन म्हणाले “,चल, जर बाहेर जाऊन येऊ म्हणजे तुला बरे वाटेल. “घरी आल्यावर देवापुढे सांजवात लावायला गेले आणि मी ओरडलेच .माझे ओरडणे ऐकून हे आले.मी काही न बोलता नुसते बोट देव्हार्याकडे दाखविले.गणेशाची चांदीची मूर्ती आणि सर्व चांदीची पूजेची उपकरणी गायब झाली होती.मोबाईल पण जागेवर नव्हता.देव्हार्यात एक चिठ्ठी सापडली.
“नीला,मी तुझी बालमैत्रीण नाही.मी नाशिकला राहत नाही.माझ्या तोंडावरील व्रणाबद्दल विचारलेस तेंव्हा मी हबकलेच होते.तुला दाखविलेला व्रण कान्जीण्याचा नव्हता तर कधीतरी झालेल्या जखमेचा होता.पण तुझी समजूत पटली माझ्या प्रसंगावधानाचे कौतुक करशील न?मी सेंट कोलाम्बात कधीच शिकले नाही.४थि जेमतेम शिकले आहे.शिरवाडकरांकडे माझा भाऊ कामाला होता.तेंव्हा त्यांच्याकडूनच तुमच्याबद्दल माहिती मिळाली.फार पूर्वतयारी करावी लागते ग आम्हाला.खूप कष्ट आणि धोका असतो .तू कौतुक करशीलच ह्या गोष्टींचेही .पोलिसात तक्रार करायची असेल तर कर बापडी !पण उपयोग काहीच होणार नाही ह्याची खात्री देते.खूप नाती सांभाळून असतो आम्ही.
—-नीला शरद ठोसर—-.

nrutya-laghukatha

pnrutya
ध्याकाळी office मधून घरी आले.दार उघडताच दारात पडलेल्या निमंत्रण पत्रिकेने माझे लक्ष्य वेधून घेतले.सुंदर तांबडा मखमली कागद ,सोनेरी गोंडे असलेली सुबक बांधणी ,आणि मुखपृष्ठावर नटेश्वराचे आकर्षक चित्र …! आतमध्ये सुनेत्राच्या अरंगेत्रम च्या कार्यक्रमाचे निमंत्रण होते .नमिता केळकरने म्हणजे सुनेत्राच्या आईने पाठवलेले..नमिता माझी गळ्यातली मैत्रीण आणि सुनेत्राची तर मी लाडकी मावशीच होते.सुनेत्रा ४थित होती तेंव्हापासून तिची नृत्याची आवड नमिताने जोपासली होती.तिला भरत नाट्यमचे शास्त्रशुध्द शिक्षण देत होती.नमिताच्या प्रोत्साहनामुळेच भरतनाट्यम मध्ये पारंगत होऊन आज ती आपली कला तिच्या गुरूपुढे सदर करणार होती.ठरलेल्या वेळी आम्ही सदानंद नाट्य मंदिरात पोहोचलो.नमिता दारातच कुटुंबीयासमवेत हसतमुखाने सर्वांचे स्वागत करीत होती.शेवंतीच्या पिवळ्या धम्मक गेंदेदार फुलांची सजावट डोळ्यांना आल्हाद देत होती आणि मंदशी मधुर सतारीची सुरावट कानांना सुखावत होती.वातावरणात पसरलेला चंदनाचा सुगंध मने प्रफुल्लीत करीत होता.थोड्याच वेळात पडदा वर गेला.रंगमंचावर एका बाजूला गणेशाची सुंदर मूर्ती होती.तिच्या दोन्ही बाजूला उंच समया तेवत होत्या.आणि दुसर्या बाजूस एका मंचावर वाद्यवृन्दाचा ताफा स्थानापन्न झाला होता.गायिकेने वाद्यवृन्दाच्या साथीने गायनाला सुरवात करताच रंगमंचाच्या एका बाजूने लयदार पावले टाकीत सुनेत्राने रंगमंचावर आगमन केले.रुंद जरीच्या काठाची लाल रंगाची भरत नाट्यम साठी तयार केलेली रेशमी साडी. आणि लखलखणारे दागिने ..केशरचनेवर माळलेले मोगर्याचे गजरे आणि हाताच्या ओंजळीत मोगर्याची फुले..साजेसा make up आणि ओठावर आत्मविश्वासाचे गोड हास्य …! किती सुंदर दिसत होती सुनेत्रा.!स्वागत गीताच्या तालावर लयबद्ध नृत्य करत सुनेत्राने प्रेक्षकांचे स्वागत केले आणि ओंजळीतील फुले प्रेक्षकांना अर्पण केली.नंतर मोहक पदन्यास करीत तिने बाजूच्या गणेश मूर्तीजवळ जाऊन गणेशाला वंदन केले तसेच वाद्यवृन्दातील प्रत्येकाला वंदन करून गणेश वंदना हे नृत्य सदर केले.त्यानंतर आपली कला सदर करण्यास सुरवात केली.शास्त्रशुद्ध लयबद्ध मोहक पदन्यास आणि गीताच्या अर्थाला शोभेलसा विलोभनीय अभिनय नृत्यातील तिची परिपूर्णता अधोरेखित करीत होते.मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे प्रेक्षक खुर्चीला खिळून होते.शेवटच्या नृत्यानंतर टाळ्यांचा उत्स्फूर्त कडकडाट करून प्रेक्षकांनी तिच्या कलेला दाद दिली.नंतर सुनेत्रा आणि तिचे कुटुंबिय सुनेत्राच्या गुरुसह रंगमंचावर आले.सुनेत्राने गुरूला गुरुदक्षिणा अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला .नमिताने सर्व उपस्थितांना अल्पोपहारास निमंत्रित केले .अल्पोपहारानंतर दारावर उभे राहून नमिता आणि कुटुंबीय जातीने सर्वाना धन्यवाद देत होते.त्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्य पूर्तीचा आनंद ओसंडून वाहत होता.”नमे,दृष्ट लागण्यासारखा झाला ग कार्यक्रम..!सुनेत्रा किती गोड दिसत होती ,”मी नमिताचे मनापासून कौतुक केले .नमिताच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले .त्यात लेकी बद्दलचा अभिमान आणि कौतुक ह्या भावना स्पष्ट दिसत होत्या. घरी परतताना पुलाखाली एक माणूस पेटी वाजवताना दिसला.त्याच्या एका बाजूला फाटक्या साडीतील एक बाई गाणे म्हणत होती.आवाज गोड नव्हता पण कमावलेला होता.धारदार ,दमदार काहीसा पहाडी वाटावा असा होता.पेटीवाल्याच्या दुसर्या बाजूला ९/१० वर्षाचा एक मुलगा दोन्ही हातात २/२ चपट्या फरश्या घेऊन गाण्याला ताल धरत होता.त्यांच्या भोवती दिवसभर कष्ट करून थकलेली कामकरी माणसे पथार्या पसरून बसलेली होती.इतक्यात एक १२/१३ वर्षाची काळी सावळी मुलगी गाण्यावर नाच करू लागली.जीर्ण होऊन भोके पडलेली चोळी,घागरा आणि ओढणी …!गळ्यात एक मण्याची माळ आणि कानात लांब लांब डूल…केसात कानावर प्लास्टिकचे लालभडक फूल खोवलेले..!अंगभूत कमनीयता लाभलेल्या तिच्या देहाला आजूबाजूचे भान नव्हते.अंतर्मनात निर्माण झालेल्या कोणत्यातरी अनामिक आनंदाच्या लहरीवर बेभान होऊन तिचे पाय थिरकत होते.डोळ्यात प्रसन्नता होती आणि ओठावर लोभस हसू.अंगावर जवळ जवळ चिंध्या असलेला तिचा देह सौंदर्याने न्हाल्यासारखा दिसत होता.थोड्यावेळाने पेटी बंद झाली गाणे थांबले .नाच थांबला.सर्वांनी बसल्याजागीच आपापल्या पथार्यावर अंग आडवी केली.ती मुलगी गाणे म्हणणाऱ्या त्या बाई जवळ येउन बसली.तिने मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरला आणि कौतुकाने मुलीकडे पाहत राहिली.तिच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.नमिताच्या डोळ्यात तरळत होते तसेच….!
—-नीला शरद ठोसर—–.

kachapani

लहानपणी आम्ही काचापाणी खेळत असू.रंगीबेरंगी काचेच्या बांगड्यांचे ओंजळभर तुकडे जमा झाले कि खेळ सुरु.ह्यात हिरव्या आणि लाल रंगांचे तुकडे संख्येने जास्त असत म्हणून त्यांना एक गुण असे .पोपटी,निळ्या,पांढ-या, काळ्या रंगांचे तुकडे कमी असत.म्हणून त्यांना संख्येच्या प्रमाणात गुण ठरविले जात.त्यातही वर्खाच्या चाकाक णा-या तुकड्यांना कॅरम मधल्या राणीच्या सोंगटी सारखे महत्व असे.असे ओंजळभर तुकडे एका खडूने काढलेल्या लहानश्या वर्तुळात टाकायचे.एखादा तुकडा वर्तुळाबाहेर गेला कि बाद व्हावे लागे.त्यामुळे त्या लहानश्या वर्तुळात तुकडे जास्तीत जास्त पसरवून टाकणे हे कौशल्याचे काम असे.नंतर एक एक तुकडा दुसर्या तुकड्यांना न हलविता उचलायचा .एकदा तुकडा हलला कि बाद व्हावे लागे.मग दुसरा खेळाडू उरलेल्या तुकड्याने खेळे.त्याला तुकडे पसरवून टाकायची संधी जास्त मिळे पण एखादा निष्णात खेळाडू इतके तुकडे आधीच उचली कि दुसर्याला फारच कमी तुकडे खेळायला राहत .ह्यामुळे भांडणे होऊ लागली.मग आजीने तोडगा सुचविला कि खेळाडूचा डाव संपला कि त्याचे गुण लगेच मोजून लिहून ठेवायचे आणि दुसर्या खेळाडूने सर्व तुकाद्यानीच खेळायचे.
इतका साधा खेळ पण आम्ही त्यात तासंतास रंगून जात असू.खेळता खेळता कितीतरी कौशल्ये आपोआप शिकली जात.एक म्हणजे ओंजळीतले काचेचे तुकडे आणि वर्तुळाचा आकार ह्याचा अंदाज घेऊन ते तुकडे जास्तीत जास्त पसरवून टाकण्यासाठी ओंजळ जमिनी पासून किती अंतरावर ठेवून,आणि किती जोर लावून तुकडे खाली टाकायचे ह्याचा विचार करावा लागे..आणि दुसरे म्हणजे हे तुकडे गोळा करताना मन अतिशय एकाग्र करावे लागे.आजुबाजुच्ये सुटे सुटे तुकडे तर सहज उचलले जात .पण एकावर एक चढलेले तुकडे उचलताना मनाच्या एकाग्रतेची कसोटी लागे .तुकडा कोणत्या बाजूने उचलायचा ह्याचा अंदाज घेऊन तो हलकेच २ बोटांच्या चिमटीत पकडून उचलताना इतर बोटांवरही ताबा ठेवावा लागे.श्वासावर सुद्धा नियंत्रण ठेवावे लागे.कधी कधी हि कसरत करताना नाक पार जमिनीला टेकले जाई.
ह्या सर्व गोष्टींचा ,अभ्यास करताना उपयोग होत असेल का?होत असणारच.कारण त्यावेळी मन एकाग्र करण्यास शिकवणारे क्लास नव्हते आणि औषधाच्या गोळ्याहि मिळत नव्हत्या ..
—नीला शरद ठोसर—