वृद्धत्व –एक आनंदयात्रा

वृद्धत्व –एक आनंदयात्रा —
५ वाजता साधनाताईनी हातातल्या पुस्तकातील पानात बूकमार्क ठेवून पुस्तक बंद केले आणि त्या उठल्या .स्वयंपाकघरात आल्या. त्यांनी आपल्यासाठी गोळीचा चहा बनवला आणि बाल्कनीतल्या आराम खुर्चीत बसून निळ्या निरभ्र आकाशाकडे मायेने पहात आरामात गरमगरम चहाचे घुटगे घेत त्यांनी सावकाश चहा संपवला.मग बेसिनवर जाऊन त्यांनी स्वच्छ तोंड धुतले.आणि केस विंचरले..हल्ली हात मागे जात नाहीत म्हणून त्यांनी केस कापूनच घेतले होते.कपाटातील इस्त्रीचा ड्रेस घातला.आणि त्या आरश्या पुढे उभ्या राहिल्या.त्यांनी तोंडावरून हलकासा पावडरचा हात फिरवला.छोटीशी टिकली लावली .perfume चा हलकासा स्प्रे मारला..गळ्यात मोत्याची माळ आणि कानात मोत्याची कर्णफुले घातली.हातात सुडोकूचा कागद घेऊन त्या सोसायटीच्या बागेत आल्या.आणि इतर समवयस्क मैत्रिणीची वाट पहात बाकावर बसल्या.एकीकडे सुडोकुवर विचार करू लागल्या.इतक्यात सार्वजणी आल्याच.
“तुम्हाला बरे बाई जमते टकाटक राहायला.”सुमित्राताई त्यांच्या शेजारी बसत म्हणाल्या,”माझ्या मागे ही गुढगेदुखी लागल्यापासून माझा तर सगळा उत्साहच संपलाय.कधी कधी अश्या मरणाच्या वेदना होतात न..!” “अहो मी तर तुमच्या पेक्षा ३ वर्षांनी मोठी..मलाही आहे हा त्रास..पण मी आपली त्याला माझा मित्रच मानते म्हातारपणी मला सोबत करायला आलेला ..मग सोपे होते हो जरा”.
“कमाल आहे बाई तुमची.ह्या वयात एकट्या रहाता.”सीमाताई बाकावर बसत म्हणाल्या.”मुलगा सून बोलावतात हो मला;पण मला आपले येथेच बरे वाटते.आपल्या ह्या म्हातारपणाच्या सवयी..कधी झोप लागतच नाही आणि मग पहाटे पहाटे डोळा लागला कि सकाळी उठायला उशीर होतो..त्यांचे कसे घट्ट टाईम टेबल असते..त्यात आपले हे असे वेळीअवेळी उठणे त्रासदायक ठरू शकते हो..शिवाय आपले पथ्यपाणी ..जास्त तिखट नको/जास्त तेलकट तुपकट नको /गोड नको/काही गोष्टी चावत नाहीत…४ माणसांच्या संसारात हे सर्व नियम पाळायचे म्हणजे करणार्याला थोडातरी त्रास होतोच कि..इथे कसे?मी एकटीच असते.म्हणून सोपे जाते.शिवाय आपल्याला जशी लहर लागेल तसे करता येते.”साधनाताई म्हणाल्या.
“सध्या ठीक आहे हो..पण उद्या हातपाय थकले म्हणजे?”नंदिताताई संभाषणात सामील होत म्हणाल्या.”मग जाईनच कि लेकाकडे.म्हतारपणाचे भोग कुणाला चुकले आहेत?पण म्हणून आत्तापासून कश्याला माझी कटकट त्याच्या मागे लावू?”साधनाताई म्हणाल्या,”मी तर लेकाला सांगूनच ठेवले आहे मी अंथरुणावर लोळले कि मला एकाद्या छानश्या वृद्धाश्रमात ठेव..हल्ली तेथे डॉक्टर नर्स ,वेळोवेळी सर्व तपासण्या ,औषधपाणी ,पथ्यपाणी अशी सर्व उत्तम सोय असते.पण तो निर्णय त्याने घ्यायचा.कारण त्यावेळी मी तर परावलंबी झालेली असणार;आणि अश्या माणसाला स्वतःचे मत कुठे असते?”हसतहसत साधना ताईनी आपले बोलणे पूर्ण केले आणि अंधार पडला म्हणून सगळ्याजणी घरी जाण्यासाठी उठल्या.पण प्रत्येकीच्या मनात साधनताई चे बोलणे रेंगाळत होते.
–नीला शरद ठोसर –(२३/१२/२०१८)

वृद्धत्व –ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृध्द

वृद्धत्व —ज्येष्ठ नागारिक आणि नुसतेच वयोवृध्द.
निसर्ग नियमाप्रमाणे दर वर्षी वय वाढतेच .आणि असे वय वाढता वाढता एखादी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक ह्या व्याख्येत बसू लागते.पण ह्या पदाला पोहोचलेल्या सर्वच व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असतातच असे नाही.कारण त्यातल्या काही व्यक्ती फक्त म्हातार्या व्यक्ती असतात.फक्त वयानेच वाढलेल्या..! अश्या व्यक्ती आपले म्हातारपण इतरांच्या गळी उतरवून घरातल्यांचा / आजूबाजूच्या लोकांचा/नातेवाईकांचा आधार शोधत असतात.त्या ज्येष्ठ नागरिक नसतात.आपल्या असलेल्या नसलेल्या आजारपणाचे सदोदित तुणतुणे वाजवत रहातात.आणि मग घरातल्या वर बोजा होतात.अश्या रडगाणे गाणार्या म्हातार्या व्यक्तींचा लोकांना कंटाळा येतो.ते त्यांना टाळू लागतात.त्या एकाकी पडतात.मग आपले कोणी ऐकत नाही/ आपल्याला कोणी मान देत नाही आपली आता किमतच उरली नाही अश्या तक्रारी करू लागतात..आणि हेकेखोर , चिडचिड्या किंवा शीघ्रकोपी बनतात.
ह्या उलट ज्येष्ठ नागरिकांचे वागणे असते .असे लोक आजारी असले तरी कोणी विचारले”कसे आहात?” तर हे हसत म्हणतील,”मजेत.”कोणी विचारले “काय म्हणतेय तब्येत?”तर हे म्हणतात ,”एकदम मस्त”.मग दुसर्या विषयावर ओघानेच वळण घेतले जाते.अश्या ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला बोनस म्हणून प्राप्त झालेल्या वयाचा उपयोग वाचनासाठी करतात.आणि आपले ज्ञान अद्यावत ठेवतात .त्या मुळे कोणालाही अश्या व्यक्तीनबरोबर बोलायला आवडते.ज्येष्ठ व्यक्ती आपले पूर्वायुष्यात काही कारणामुळे अपुरे राहिलेले छंद जोपासतात.त्यामुळे त्या आनंदी समाधानी आणि तरतरीत दिसतात.
कुटुंबाच्या किंवा शेजार्यापाजार्यांच्या भानगडीत त्या नाक खुपसत नाहीत.त्यांना फुकटचे सल्ले देत बसत नाहीत.आपण चार पावसाळे इतरापेक्षा जास्त बघितले म्हणजे आपण सर्व ज्ञानी झालो असे त्यांना वाटत नाही.कोणाला गरज भासली तर यथा शक्ती मदत करण्यास तयार असतात.त्या मुळे त्या आपला आदर टिकवून रहातात.
ज्येष्ठ नागरिक नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाशी जमेल तशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात.आजूबाजूला घडणार्या अनेक नवीन गोष्टी शिकण्यात रस घेतात.ह्या उलट म्हातार्या व्यक्ती “आता काय करायचे आहे शिकून?केला ना संसार ह्या गोष्टींशिवाय ?”असे म्हणत रहातात.नवीन गायक,नवीन लेखक,नवीन चित्रपट,नवीन गाणी असे त्यांना काहीच आवडत नाहीत कारण ते जाणून घेण्याचा प्रयत्न च ते करीत नाहीत.
आजकाल तर काही ज्येष्ठ नागरिक एकटेच स्वतंत्र रहातात ..मुले ,मुली नातवंडे ह्यांच्याशी निमित्ताने भेटतात.त्यांनी आग्रहाने बोलावले तर चार दिवस राहून परत येतात: म्हणतात “अरे हातपाय चालत आहेत तोवर राहतो असे..ते कुरबुर करू लागले कि यायचे च आहे तुमच्याकडे”..मला असे समंजस ज्याष्ट नागरिक फार आवडतात.
—नीला शरद ठोसर–(१०/१२/२०१८)

अनवट नाते

अनवट नाते—-
शाळेतून अमर घरी आला.गळ्यातील किल्लीने त्याने दार उघडले.पण आत येताना उंबरठ्याला ठेचकाळून पडला.अंगठ्यातून जीवघेणी कळ आली.तसाच लंगडत लंगडत आत आला.त्याने कसाबसा आईला फोन लावला”आई, मला ठेच लागलीय,खूप दुखतंय;आज लवकर ये न घरी”.”बाळा मी तुझी आई नाही .पण मला सांग रक्त येतंय का?”पलीकडून आवाज आला.” नाही न?मग असे कर,फ्रीज मधला बर्फ काढून .एका towel मध्ये गुंडाळून घे,आणि अंगठ्याला शेक..पाय उशीवर ठेव हं?बघ तुझी कळ कमी होईल.जमेल न बर्फ काढायला?”आवाज म्हणाला.”हो”अमर कसेबसे म्हणाला.”रडू नको,माझा नंबर लिहून घे.जास्त दुखायला लागले तर फोन कर”आवाज म्हणाला.”बर”,अमर म्हणाला.
आई घरी येताच त्याने आईला मिठी मारली..आणि आईने काही विचारायच्या आत तिला हुंदके देत सर्व सांगितले.”बरबर..रडू नको.आपण आता लगेच डॉक्टर काकांकडे जाऊ”आई म्हणाली.
“आता उद्या शाळेला सुट्टी बर का अमर राव.घरातच आराम करायचा.”डॉक्टर म्हणाले.त्यांनी आईला २ गोळ्या दिल्या.एक रात्री जेवणानंतर आणि दुसरी सकाळी जेवणानंतर घेण्यासाठी.आणि बर्फाने शेकायला सांगितले.
दुसर्या दिवशी अमर उठला.अंगठा दुखत नव्हता.तरीही आईने रजा घेतल्यामुळे तर त्याला जास्तच बरे वाटू लागले.जेवल्यानंतर अमर आईला म्हणाला “आई त्या मावशींचे आभार मानायला हवेत.त्यांनी मला त्यांचा फोन नंबर दिलाय.””चल, आत्ताच करते.”हेलो,madam,मी अमरची आई बोलतेय.तुमचे आभार मानण्यासाठी फोन केला .आईने असे म्हणताच ,पलीकडून आवाज म्हणाला,”अहो आभार कसले त्यात?आणि मी madam नाही हं ,;सुमामावाशी म्हणतात सगळे मला.अमर ठीक आहे ना?””हो,त्याला बोलायचे आहे तुमच्याशी”असे म्हणत आईने अमरला फोन दिला.”मावशी,तुम्हाला खूप खूप thanks ..डॉक्टर काका म्हणाले बर्फाने शेकाल्यामुळे जास्त सूज आली नाही.”अमर म्हणाला.”वा,छान आता विश्रांती घे.आणि मी सुमामावशी बर का?कधीही फोन कर”
त्या नंतर ८/१० दिवस गेले असतील…शाळेतून वक्तृत्व स्पर्धेला जाणार्या मुलांपैकी एकजण आजारी पडला.आणि बाईनी अमरला तयारी करायला सांगितले.फक्त एकच दिवस मध्ये होता.आई घरी आल्यावर जेवणाचे बघून मग भाषण लिहून देणार सकाळी शाळा,,भाषण पाठ कधी करणार?सुमामावाशीला विचारू का?असा विचार मनात आला मात्र त्याने लगेच फोन लावलाच.
विषय काय आहे असे तिने विचारताच अमर म्हणाला “माझे स्वप्न” मग सांग बघू , काय आहे तुझे स्वप्न?सुमा मावशीने विचारले.”मला बाबांसारखे सैन्यात जायचे आहे.”अमर म्हणाला.”अरे वा,छानच की..कुठे असतात तुझे बाबा?”सुमामावाशीने विचारले.”फोटोत”,पण तिथूनच ते माझ्याकडे बघून हसतात.आई म्हणते माझे बाबा खूप पराक्रमी होते. आपल्या राष्ट्रपतींनी सुद्धा गौरव केला,असा पराक्रम…!’अमर म्हणाला.”वा ,खूपच भाग्यवान आहेस तू.आत्ता माझ्याशी जे बोललास ना तेच लिहून काढ .कि झाले भाषण तयार..तुला पाठ करावेच लागणार नाही मुद्दाम.”सुमामावाशी म्हणाली.
अमर हातात पदक नाचवतच घरी आला.लगेच त्याने मावशीला फोन लावला.”अरे वा ,सोल्जर ,तू तर कमाल केलीस”सुमामावाशी म्हणाली.त्यानंतर सुमामावशी त्याला सोल्जरच म्हणू लागली. काहीही घडले,/अभ्यासात अडले,नवीन पहिले कि लगेच सोल्जरचा सुमामावाशीला फोन गेलाच म्हणून समजावे…एक दिवस अमर फोनवर म्हणाला,’सुमामावशी,आज मी रस्त्यात एक चिमणी मरून पडलेली पहिली.मला रडूच यायला लागले.छान चिवचिव करत इथे तिथे आनंदाने नाचणारी चिमणी अशी कशी मेली?””अरे रडू नको;ती न दुसर्या जगात गेलीय आनंद वाटायला.”सुमामावशीने असे सांगितल्यावर अमरला खूप हायसे वाटले.
*************
अमर नंतर कॉलेज शिक्षणासाठी शहर सोडून गेला..मग आणखी पुढचे शिक्ष घेण्यासाठी आणखी मोठ्या शहरात गेला,आणि मग नोकरीसाठी एकदम परदेशातच गेला..खूप वर्षाने योगयोगाने तो आपल्या जुन्या शहरात आला.आणि त्याला सुमामावाशीची आठवण
झाली..मधल्याकाळात तो सर्व विसरलाच होता.त्याने लगेच फोन लावला.”हेल्लो,कोण बोलताय?”पलीकडून आवाज आला.”मी अमर म्हणजे सोल्जर बोलतोय ,सुमामावाशीला फोन देता का?”अमर म्हणाला. ती माझी मोठी बहिण..ती नाही बोलू शकणार तुमच्याशी..पण तिने एक चिठ्ठी लिहून ठेवलीय तुमच्यासाठी..लहानशीच आहे…वाचून दाखवू?आणि उत्तराची वाट न पाहता आवाजाने वाचायला सुरवात केली,”प्रिय सोल्जर , ,मी दुसर्या जगात जातेय तिथल्या अमरशी आणि इतर मुलांशी बोलायला.कदाचित तुझ्या बाबांशी भेट होईल तेथे ,माझे तेव्हढे पुण्य असेल तर.त्यांना…..”पण पुढचे अमरला ऐकूच गेले नाही.त्याच्या हातातील फोन केंव्हाच गळून पडला होता.
—नीला शरद ठोसर–(३/१२/२०१८)