samadhan

समाधान–
“बाई,ओळखलत?मी गणेश.”गीताने गोंधळून पहिले.एक उंचापुरा,बळकट अंगकाठीचा आणि निगा न राखलेल्या दाढी मिशी चा २२/२३ वर्षाचा तरुण तिच्या पुढ्यात उभा राहून विचारत होता.तोच पुढे म्हणाला,”बाई,तुम्ही ८वित वर्गशिक्षिका होतात आम्हाला.मी मोनिटर होतो वर्गाचा.सर्व मुले काय धाकात होती माझ्या.हातात पट्टी घेऊन टेबलाजवळ उभा राहिलो कि काय टाप होती कोणाची तोंडातून ब्र काढायची.सर्व टरकून असायची आपल्याला.एकदा असाच मी उभा होतो पट्टी घेऊन.इतक्यात 2 मुले तोंडावर हात ठेवून माझ्याकडे पाहून काहीतरी कुजबुजताना आणि हसताना मी पहिली.मी जाम भडकलो.सरळ त्यांच्याकडे गेलो आणि हातावर २/२ पाट्या दिल्या लगावून.ती कळवळली.”हसताय न?आता हसा ?कि ओढू अजून २ पट्ट्या?”पण इतक्यात तुम्ही वर्गात आलात…समोरच्या वर्गात शिकवत होतात तुम्ही.आणि सर्वांसमोर मलाच ओरडलात,पट्ट्या मारल्याबद्दल.माझी मोनिटरशिप रद्द केलीत.तेव्हापासून आपली वर्गावरची वट च गेली.सर्व जण माझी टर उडवायला लागली.”इतक्या वर्षापूर्वीची गोष्ट ह्याच्या अजून लक्ष्यात राहिली होती हे पाहून गीता आणखीच गोंधळली ,अस्वस्थ झाली.काहीतरी बिनसले होते गणेशचे..’ते जाऊ दे,मला सांग,हल्ली काय करतोस तू?पुढे शिकतोयस कि नोकरीला लागलास?”गीताने विचारले.”नोकरी बिकरी काही करत नाही आपण एस.एस.सी.पासच झालो नाही न?हा ,पण एकदा वडिलांनी खटपट करून एका कारखान्यात कामाला लावले होते.जाम का करून घ्यायचा तो मुकादम.मलाच जास्त काम सांगायचा.””असे का वाटायचे तुला?”गीताने विचारले.”आपण ऐकून नाही घ्यायचो न कुणाचे?त्याची खुन्नस माझ्यावर काढायचा.एकादा दिवस उशीर झाला तर बोम्बलायचा .मग मी पण भडकायचो.एक दिवस तर कहरच केला त्याने.मी राजा मागितली तर दिली नाय आणि दुसर्याला दिली.मी विचारले तर म्हणाला ,”माझी मर्जी”.माझी तर एकदम सटकलीच .”त्याला म्हटले,”तुझी मर्जी काय?अरे एक कानाखाली लगावली तर पाणी मागणार नाहीस,असल पाप्याच पितर तू…आणि रुबाब कोणावर करतो रे?”असे म्हणत काढला त्याच्या कानाखाली आवाज! हेलपटत कडमडलाच तो जमिनीवर.मग मालकाने काढून टाकले कामावरून.तेंव्हापासून ठरवून टाकले कोणाची चाकरी करायची नाय.”
गीताला गणेशच्या स्वभावाचे कोडे थोडेसे उलगडत आहे असे वाटू लागले.पण खात्री करून घेण्यासाठी तिला त्याच्या आईवडीलाना भेटणे जरुरीचे वाटू लागले.”जुन्याच जागी राहता नारे तुम्ही ,कि नवीन जागा घेतलीत?”गीताने विचारले.”आम्ही कसली नवी जागा घेतोय?जुन्या जागेतच मारतोय अजून,”गणेश तुसडेपणाने म्हणाला.दुसर्या दिवशी गीता गणेशच्या घरी गेली.”मी गणेशची शाळेतली शिक्षिका”गीता गणेशच्या आईला म्हणाली.तिने एक लोखंडी खुर्ची उघडून गीताला बसायला दिली.”गणेश नाही का घरी?”तिने विचारले.”गेला असेल कुठे मारामारी करायला “वडील त्राग्याने म्हणाले.त्यांच्याशी बोलल्यावर गीताला समजले कि गणेश बेकार आहे.दिवसभर आजूबाजूला टगेगिरी करत सर्वाना दमात घेत असतो.आणि त्याच्या नेत्याचा आदेश आला कि २/२ दिवस गायब होतो.आल्यावर आईच्या हातावर पैसे टिकवतो.””म्हणजे?त्याला कश्याबद्दल पैसे मिळतात?गीताने घाबरून विचारले.”मी सांगतोना..!”गणेशच आत येत म्हणाला.”मी कार्यकर्ता आहे.आदेश आला कि काठ्या सळ्या घेऊन आणि आपली पंटर सेना घेऊन हजर राहायचे.कधी व्यापार्यांकडून निरनिराळ्या उत्सवासाठी वर्गणी गोळा करायची कधी एखादे सामान सांगतील त्या ठिकाणी पोहोचवायचे.कधीकधी बंद चा पुकारा होतो.त्यासाठी दुकाने जबरदस्तीने बंद करायला लावायची.नाही ऐकले तर दुकानाच्या सामानाची तोडफोड करायची.बंद चिघळला तर कधी कधी बस ,मोटारी पण जाळाव्या लागतात.अश्या कामाचे पैसे पण भरपूर मिळतात.”हे ऐकून गीता तर हादरलीच.आपलाच एक विद्यार्थी असा चुकीच्या मार्गाला लागलेला पाहून खूप अस्वस्थ झाली.तिच्या मनात विचार आला,”ह्या मध्ये शाळेचाही दोष होता.गणेश अभ्यासात यथातथाच होता.पण अंगात रग होती.म्हणून वर्गात खोड्या काढायचा,इतरांशी भांडून मारामार्या करायचा.त्याचे आईवडील अशिक्षित.मार्गदर्शन च नाही कोणाचे.आणि आम्ही शिक्षकांनी सुद्धा त्याला शिक्षा करण्या पलीकडे काहीच केले नाही.”आता तरी चूक सुधारली पाहिजे असे वाटून ती गणेशला म्हणाली,”अरे देवाने इतकी ताकद दिली आहे ,तर काही खेळ का खेळत नाहीस?””टाइम कुणाला हाय बाई?शाळेत असताना कबड्डी छान खेळायचो.पण शारीरिक शिक्षणाच्य सरांनी कधी टीम मध्ये घेतलेच नाही.म्हणायचे,”खेळताना एखाद्याचा जीव घेतलास तर केव्हद्याला पडेल ते शाळेला?”आता आपल ब्येस चालल आहे.पहिल्यांदा म्हणत,बापाच्या जीवावर घरी बसून गिळतो म्हणून .आता कोणाची टाप नाय मला काही बोलायची.सगळे दादा म्हणतात आपल्याला.”त्याच्या बोलण्यात बेदरकारी होती.
गीता घरी आली पण मनातून गणेशचा विषय जात नव्हता.त्याच्या शारीरिक क्षमतेला योग्य वळण लावावयास हवे होते.२/४ दिवसांनी गीता पुन्हा गणेशच्या घरी गेली.त्याच्या हातात एक चिठ्ठी देत म्हणाली,”गणेश हा एका व्यायामशाळेचा पत्ता आहे.तेथे माझा एक माजी विद्यार्थी कबड्डीचा प्रशिक्षक आहे.त्याला मी तुझ्याबद्दल बोलले आहे.त्याला जाऊन भेट.त्याच्या हाताखाली कबड्डीचे शास्त्रशुध्द शिक्षण घे.””बाई ,आपली लाईन आता ठरलीय.गणेश घुश्य्यातच म्हणाला.”ठीक आहे ना?पण माझ्यासाठी एकदा ह्या सरांची भेट घे.”गीता म्हणाली.आपण बाईंवर खूप उपकार करतोय अश्या थाटात गणेशने चिठ्ठी घेतली.
मध्यंतरात गणेशची भेट झाली नाही.पण तो कबड्डीचा सराव नियमित करतोय येव्हढे गीताला समजत होते.आणि एक दिवस वर्तमानपत्रात गीताने गणेशचा फोटो पहिला.कबड्डीच्या प्रो लीग स्पर्धामध्ये गणेश चांगलाच चमकला होता.सामने संपले आणि एक दिवस हातात मिठाईचा पुडा घेऊन गणेश गीताच्या दारात उभा राहिला.डोळ्यात आनंद ओसंडून वाहत होता.दारातच उत्साहाने म्हणाला,”बाई ,तोंड गोड करा आधी.ह्या स्पर्धांमध्ये चांगली कमाई झाली आणि एका प्रसिध्द उद्योगसमूहात नोकरी पण मिळाली.त्यांच्या संघाचा कप्तान म्हणून.”आणि खाली वाकून गीताला नमस्कार केला.दाटल्या आवाजात म्हणाला,”बाई ,तुमच्यामुळे च घडले हे सर्व…”आणि डोळे भरून आले त्याचे… आणि गीताचेही..!
“अरे गणेश,पण मेहनत तर तूच केलीस न?”गीता म्हणाली.”बाई, लाजवू नका मला.मी फार फार चुकत होतो.ताकदीला नियमांचे ,संयमाचे आणि शिस्तीचे वळण लावावे लागते,हे मला कबड्डी खेळायला लागल्यावरच समजले.आणि ते तुमच्या मुळेच ते शक्य झाले.””बरे तर ..!आता अजून एक गोष्ट ऐकायची बाईंची.तुझी लढाई अजून संपलेली नाही.हे यश टिकवायला सतत मेहनत घ्यावी लागेल”गीता म्हणाली.”हो बाई,आता स्पर्धा माझ्या स्वतःशीच आहे.माझी कामगिरी सतत उंचावत ठेवण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे.आणि मी तसाच प्रयत्न करत राहीन.”गणेशाच्या डोळ्यात निग्रह दिसत होता आणि गीताच्या डोळ्यात समाधान..!एका आयुष्याचा कडेलोट होता होता ते वाचवता आल्याचे समाधान…!
—-नीला शरद ठोसर—-(२१/७/२०१५)