pakshyacha shodh

पक्ष्याचा शोध–
आमच्या इमारतीच्या मागील इमारती समोर पाण्याचा साठा आहे…हा शब्द अश्या साठी वापराला कि ते तळे आहे कि नाल्याचे पाणी साठलेले आहे कि गटार तुंबले आहे ह्याचा आजपर्यंत कोणालाच उलगडा झाला नाही आहे…पण कोणी त्या बाबत तक्रार हि केलेली नाही..म्हणून ते जे काही आहे ते अजून आहे…तर सांगायचं मुद्दा असा कि तेथे झाडेही आहेत…आश्चर्य जरा बाजूला ठेवून पुढे वाचा…तर ह्या पाण्यावर खूप पक्षी सकाळची न्याहारी करायला येतात..आणि मनसोक्त भरपेट जेवले कि शतपावली,(आपल्या भाषेतली,…त्यांच्या भाषेत ह्याला काय म्हणतात ह्याचा शोध अजून लागायचाय) करतात…आणि उडत उडत आमच्या इमारतीतल्याला झाडांवर काही काळ घालवतात..तर्हेतर्हेचे आवाज वगैरे काढतात..(जेवण छान झाले वगैरे बोलत असावेत).अश्या मधून एखादा वेगळा आवाज आला,कि माझी उत्सुकता जागी होते…कि बुवा .कोण बरे असेल हा पाहुणा?मग मी लगेच बाल्कनीत जाते आणि आवाजाच्या अनुरोधाने मान वेडीवाकडी करत त्या पाहुण्याला शोधू लागते..गम्मत म्हणजे अश्या वेळी मला सर्व पानांचे आकारही पक्ष्यांसारखेच दिसू लागतात..जरा कुठे पान हलले कि मी तिकडे त्या आवाजाच्या मालकाला शोधू लागते..तर सांगायचं मुद्दा हा कि आज अश्याच प्रयत्नात माझी मान आखडली आहे…मूव्ह चोळले..परिणाम नाही म्हणून आयोडेक्स लावले..खोटे बोलतात हो हे जाहिरातवाले…अजून काही आराम नाही पडला…फीलिंग वेदनामय.
—-नीला शरद ठोसर–(२१/३/२०१७)

The SparrowDay.

The Sparrow Day —
रोजच्या प्रमाणे चिमणाबाई ग्रिल वर आल्या.”काय चिमणाबाई,आज खुशीत असाल न?””ते का ग बाई?””आज sparrow day नाही का?”काही लोक तुमच्यासाठी तयार केलेली घरटी झाडावर टांगताहेत .काही लोक तुमच्या पिण्याच्या पाण्याची सोय करताहेत.एकमेकांना संदेश देताहेत “चिमण्यांना जपा,त्यांना जगवा.””जळले मेले लक्षण ,आधी दुर्लक्ष करून मारायचं आणि मग काळजी घ्यायची.सवयच आहे ती तुम्हा माणसांची.जिते पणी त्रास द्यायचा ,आणि मृत्यू पंथाला लागला कि जीवन गौरव पुरस्कार द्यायचा.” “अंग किती त्रागा करशील?काय बर त्रास दिला आम्ही तुला?”सर्व करून सावरून मलाच विचार.आमची झाडे तोडता आणि उंच उंच टॉवर बांधता.आम्ही घरटी करायची तरी कुठे?पूर्वी स्त्रिया अंगणात धान्य पसरून वाळवायच्या.धान्य पाखडणे,निवडणे ही सर्व कामे अंगणात.चालायची.आमच्या खाण्यापिण्याची आपोआप सोय व्हायची.मग आम्हीही आजूबाजू घरटी बांधायचो.जेवणाच्या वेळी आया त्यांच्या मुलांना अंगणात “हा घास काऊचा हा घास चिऊचा” असे म्हणत भात भरावयाच्या.आम्हीही मग आनंदाने आसपास टुणटुण उड्या मारायचो.बाळे आम्हाला धरायला दुडू दुडू पळायची आणि त्यांच्या आया त्यांच्या पाठी भाताची ताटली घेऊन पळायच्या..खूप मजा यायची.प्रत्येक घरापुढे छोटेसे अंगण आणि कडेने झाडे..सतत सावली,गारवा.आणि आता ना अंगण ना झाडे उंच उंच टॉवर्स सगळीकडे..त्या उंचावरच्या घरातल्या वळचणी पर्यंत उडता तरी येते का आम्हाला?मग घरटी तरी कशी बांधणार?आणि खालच्या मजल्यावर सतत रात्रंदिवस मोटारींचे आवाज…आमची बाळे झोपणार तरी केंव्हा?जगणार तरी कसे आम्ही ह्या वातावरणात?शेताच्या आसपास धान्य मिळते पण त्यावर इतके तर्हतर्हेच्या औषधांचे फवारे मारलेले असतात कि ते खाऊनच आमची निम्मी पाखरे मरतात.सर्व आपणच करायचे आणि मग sparrow day साजरा करायचा.भंपकगिरी नुसती.”
चिमणाबाई फारच रागावली होती आज.धाप च लागली होती तिला.जरा दम खाऊन माझ्यावरच डाफरली.म्हणाली”शाळेत शिकलेली’ “उठऊठा चिमुताई”हि कविता तरी आठवते का तुला आता?कधी शिकवलीस का तुझ्या मुलांना तू ती कविता ?तुझी मुले तर इंग्रजी शाळेत शिकणारी ..हे असे होते तुमचे आपल्याच हाताने आपल्या सुंदर गोष्टी नष्ट करायच्या आणि मग त्यांच्या नावाने गळे काढायचे.पूर्वी खाणीत काम करणारे कामगार एक छोटा चिमण्यांचा पिंजरा आपल्या बरोबर नेत असत.खाणीतली हवा दूषित झाली कि चिमण्या ओरडू लागत आणि मग सगळे कामगार खाणीतून वर येत.आता तुम्हीच इतके प्रदूषण करून ठेवले आहे कि आम्हीच झालो आहोत परागंदा.”मी काय बोलणार या वर?मी काहीच बोलत नाही, सॉरी सुद्धा म्हणत नाही हे पाहून चिमुताई उडून गेली.
पण मला एक कोडे उलगडत नव्हते कि मग ही तरी इथे माझ्या खिडकीत रोज का येते?मी पहिले तर चिमणाबाई समोरच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या वळचणीतून माझ्याकडे पाहत होत्या…तो फ्लॅट हल्ली कित्येक वर्षे बंदच होता.पण मग खाण्यापिण्याचे कसे जमवले हिने?आणि मला इमारतीच्या बाहेर बसणारा चुरमुरे वाला आठवला.. आमच्या बागेतल्या झाडांच्या पालापाचोळ्या खाली किडेमकोडे तर मिळतच असतील तिला…आणि पाणी?मला मी ग्रिल मध्ये ठेवलेली पाण्याने भरलेली मनी प्लांट ची बाटली दिसली…अच्छा तो ये बात है..मी हसून चिमुताईकडे बघितले आणि बाटली काठोकाठ पाण्याने भरली.
—नीला शरद ठोसर–(२०/३/२०१७)

mule nyahalane(ek chand)

माझे तर्क करणे–(एक छंद)
दुपारी चहा घेत मी बाल्कनीत बसते…त्यावेळी शाळा सुटते आणि आईचा हात धरून मुले घरी जात असतात.त्यांना न्याहाळणे हा एक नवीन छंद मला जडला आहे.एखादा मुलगा आईचा हात धरून उड्या मारत चाललेला असतो.मधून मधून आईचा हात सोडून,बॉलिंग करण्याची action करीत असतो..अजिबात दमलेला दिसत नाही.माझा तर्क सुरु होतो,”का बरे हा इतका आनंदी आहे? त्याला शाळा खूप आवडत असावी,किंवा आज त्याचा मामा घरी येणार असेल,किंवा मग त्याच्या गणिताच्या बाईंनी आज गणिताचा गृहपाठ दिला नसेल,नाहीतर आज त्याच्या शाळेत जादूच्या कार्यक्रमासारखे काहीतरी गमतीचे झाले असेल किंवा त्याची आई त्याच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत फारच सजग असेल आणि ती त्याचा उत्साह टिकून राहील असे पौष्टिक ,आरोग्यकारक पदार्थ त्याला डब्यातून देत असेल.”…कारण कोणतेही असो,त्याचा हा उत्साह असाच टिकून राहायला हवा.त्याच्या पालकांनी त्याच्या उत्साहाला,उर्जेला छान वळण लावावयास हवे.तो भविष्यात तो एखादा उत्तम खेळाडू हि होऊ शकेल.हे सर्व विचार मनात येत असतानाच मला दुसरा मुलगा दिसतो.तो ह्या मुलाच्या अगदी उलट असतो.म्हणजे तो शांत दिसतो.सावकाश खाली मान घालून चालत असतो..माझे विचार सुरु होतात,”का बरे हा इतका त्याच्या वयाला न शोभेलसा गरीब वाटतो?त्याला शाळा आवडत नाही का?कदाचित तो वृत्तीनेच शांत आणि विचारी असेल.मन लावून अभ्यास करीत असेल,शाळेत त्याचा पहिला नंबर असेल.आणि तसे असेल,तर त्याच्या पालकांनी त्याची हि अभ्यासू आणि विचार करण्याची ताकद वाढेल असे पोषक वातावरण त्याला मिळवून द्यावयास हवे…त्याची ज्ञानाची भूक सतत वाढेल असे बघावयास हवे.”मला त्या मुलात आत्ताच एक शास्त्रज्ञ ,संशोधक,तत्त्वज्ञानी,साहित्यिक वगैरे दिसायला लागतो.इतक्यात माझे लक्ष्य एक आई वेधून घेते.ती मुलाला काहीतरी विचारत असते,मुलाचे लक्षच नसते.ती पुन्हा मोठ्याने विचारते तर हा एकदम दचकतोच..! माझे तर्क चालू होतात.”शाळेतही हा असाच आत्ममग्न राहत असेल का?बाईंनी एखादा प्रश्न विचारला कि असाच दचकत असेल का?भीतीने त्याला उत्तरही सुचत नसेल का?हा नेहमी मागेमागे च राहत असेल का?””अरे कुठून कुठे जातेस तू? तू?”मी मलाच दटावले.”असले काही नसेल..कदाचित आज त्याचे त्याच्या मित्राबरोबर भांडण झाले असेल,किंवा त्याचा मित्र आज शाळेत च आला नसेल,किंवा त्याच्या मित्राने त्याची टर उडवली असेल,.खूप संवेदनशील ,आणि भावनाप्रधान असेल तो.हो,असेच असेल””मी पुन्हा तर्क केला. .असे असेल तर पालकांनी त्याचे मन हळुवारपणे जपले पाहिजे. आजूबाजूच्या घटनांनी त्याच्यावर आघात होणार नाहीत असे पहिले पाहिजे…व्यावहारिक जगात हे मायेचे,प्रेमाचे रोपटे रुजले पाहिजे,”मी मनातल्या मनात त्याला शुभेच्छा दिल्या.त्याच्या मागेच एक मुलगा आईबरोबर जाताना दिसतो…अगदी खुशीत असतो. सिनेमातील एक लोकप्रिय गाणे मोठ्याने म्हणत आपल्याच तंद्रीत चाललेली असते स्वारी..आजूबाजूच्या लोकांची त्याला फिकीरच नसते.आवाजही गोडं आणि चालही जशीच्या तशी पकडलेली. मग एक सेकंद थांबतो आणि आईच्या तोंडाकडे मान वर करून पाहतो; …आई हसून दाद देते..”वा वा ..आईमुलाची मस्त जोडी जमलीय.असेच जमून आले आणि पालकांनी त्याचा हा गुण वाढीस लावला तर भविष्यात हा मुलगा उत्तम गायक,नाहीतर संगीत दिग्दर्शकही होईल.
“काय एकेक तर्क तुझे?सुतावरून स्वर्ग गाठण्याचाच प्रकार”माझे मन माझी खिल्ली उडवते.मग . मीहि त्याला दटावून सांगते,”अरे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात पण ते चूक असावे…बाळाचे पाय शाळेतून घरी जातानाच दिसतात.”
—-नीला शरद ठोसर–(२२/२/२०१७)

sparsh

स्पर्श–
पहाटेची हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडी आणि मऊ उबदार दुलईत सर्वांग लपेटून साखर झोपेचा आनंद घेत “स्वर्ग सुख म्हणतात ते हेच”असे मनात म्हणत बिछान्यावर पहुडलेले आपण..!खिडकीतून आलेली कोवळी किरणे अंगावर खेळू लागतात ,आपण डोळे किलकिले करून थोडेसे हसून त्यांचे स्वागत करतो ..परंतु दुपारी ताप देणारा कडक सूर्यकिरणांचा स्पर्श मात्र नकोसा होतो.पहाटेच्या वेळी येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रफुल्लित करणारा स्पर्श ,दुपारच्या कडक उन्हात अचानक आलेल्या झुळुकेचा समाधान देणारा स्पर्श ,आणि संध्याकाळी दमले भागलेल्या शरीराला हलकेच येऊन बिलंगणारा त्याच वाऱ्याचा मायेचा स्पर्श….!हे सर्वच स्पर्श किती हवेहवेसे वाटतात.पण हाच वारा वादळी स्वरूपात प्रकट झाला,तर?खिडक्या दारांवर आपटणारा,झाडांच्या फांद्या तोडणारा,विजेचे खांब उखडून टाकणारा,झोपड्यांवरची छपरे उडवणारा,वाऱ्याचा आक्रस्ताळी स्पर्श कोणाला आवडेल?नाचत खेळत पुढेपुढे येऊन पायांना हळुवार स्पर्श करणाऱ्या सागराच्या लाटांचा स्पर्श किती सुखदायक असतो!परंतु ह्याच लाटा त्सुनामी सारख्या रौद्रस्वरूपात आपल्या सीमा ओलांडून घोंघावत पुढे येऊन आपले प्रलंकारी स्वरूप दाखवितात तेंव्हा भीतीने थरकाप होतो.
मानवी स्पर्शाचेही तसेच आहे.ज्या स्पृश्यातून आनंदाची,प्रेमाची आपुलकीची,विश्वासाची देवाणघेवाण होते तेच स्पर्श हवेहवेसे वाटतात .आक्रस्ताळी,विकारी,ओंगळ,,विध्वंसक स्पर्शाची घृणाच वाटते. रोजच्या जीवनात असे अनेक स्पर्श होत असतात.काही मुद्दाम सहेतुक केलेले नवं वधूवरांचे प्रेमळ स्पर्श,,तर काही मुद्दाम करूनही सहज झाले असे दाखविणारे लबाड स्पर्श..!काही वखवखलेले संधी साधू स्पर्श,तर काही निरागस स्पर्श.काही मैत्रीचे खेळकर स्पर्श..तर काही आत्यंतिक दुःखामध्ये किंवा आत्यंतिक सुखांमध्ये आपोआप केले गेलेले निखळ आपुलकीचे उदात्त स्पर्श…आईचा मायेचा स्पर्श, आपत्तीत धीर देणारे जोडीदाराचे आश्वासक स्पर्श..प्रेमाच्या उत्कट क्षणी झालेला उन्मुक्त स्पर्श,आणि कितीतरी..!.मनातील भावना व्यक्त करण्याचे ते एक सुंदर साधन आहे.
स्पर्शातून व्यक्त झालेल्या भावना ओळखण्याचे कसब अनुभवातून येतेच.परंतु लहान मुलांना कुठे स्पर्श झाला तर तो योग्य नाही हे समजावूनच द्यावे लागते.ज्या प्रमाणे आपल्याला दुसऱ्यांचे स्पर्श होत असतात,त्या प्रमाणे आपणही दुसर्यांना स्पर्श करत असतो.अश्या वेळी आपल्या मनातील भावना नेमकेपणाने दुसऱ्याला कळतील ह्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.आपल्या स्पर्शाने,ममता,जिव्हाळा,दिलासा,प्रेम,माया आपुलकी,ह्या भावनांचा कारण परत्वे योग्य तोच अनुभव दुसऱ्याला मिळेल ह्याची दक्षता आपण घ्यावयास हवी.इतकेच नाही तर हे स्पर्श व्यक्तिसापेक्षही असावयास हवेत. लहान बालकाच्या गालाला अत्यंत मृदू असा स्पर्श केला तरच ते खुद्कन हसते.पाल्याना आईवडिलांच्या स्पर्शातून विश्वास.धैर्य मिळावयास हवे,आईवडील ,गुरु,आणि ज्येष्ठ व्यक्तींना आपल्या स्पर्शातून त्यांच्या प्रतीचा आदर जाणवायला हवा.
नवीन युवा पिढी स्पर्श्याच्या बाबतीत ज्यास्त मोकळी झालेली दिसते.हि पिढी gender baised नाही.मित्र मैत्रिणी बरोबरीच्या नात्याने वागतात.सहज एकमेकांच्या खांद्यावर हात टाकतात,हातात हात घालून चालतात,एकमेकांना चापट्या मारतात,गालगुच्चे घेतात,हे सर्व मैत्रीच्या निखळ भावनेने केलेले असते आणि म्हणूनच मैत्री अधिक घट्ट होते.मात्र अश्या वेळीही थोडी काळजी घेणे आवश्यक ठरते.आपल्या मनातील मैत्रीची भावना स्पर्शाने दृढ करताना समोरची व्यक्तीही मनाने तितकीच निकोप ,सुधृढ आणि सक्षम असावयास हवी.नाहीतर ह्या सलगीचा चुकीचा अर्थ लावला जाऊन वेगळेच प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते.जादूची झप्पी ठीकच आहे.पण ती देताना आपण ती कोणत्या भावनेने देत आहोत हे कळण्या इतकी समोरची व्यक्ती समंजस आणि परिपक्व आहे ह्याची खात्री असणे आवश्यक आहे.नाहीतर गैरसमज होऊ शकतात.एकतर्फी प्रेम,नैराश्य बलात्कार,आत्महत्या ह्या थरालाही गोष्टी जाऊ शकतात.वर्तमान पत्रातून अश्या घटना घडलेल्या आपण वाचतो.म्हणून स्पर्श करणे आणि दुसऱ्याच्या स्पर्शातील भावना समजून घेणे हे खूप जबाबदारीचे आणि खबरदारीचे काम आहे..निसर्गाच्या रूपा प्रमाणेच स्पर्श सुद्धा जितका सुंदर तितकाच विध्वंसक हि असू शकतो.
—नीला शरद ठोसर–(२०/२/२०१७

Humpty Dumpty che jeevan

“देशपांडे असे काहीनव्हते हो,किती सरळ सभ्य माणूस,”
“होय हो ,कोणाच्या अध्यात नाही कि मध्यात नाही;आपण बरे कि आपले काम बरे”.”सदोदित उत्तमोत्तम पुस्तके हातात ; लोकल मध्ये सदोदित वाचनात गढलेले;कधी कोणाची टिंगल टवाळी नाही कि कुचाळक्या नाहीत.””अशी कशी दुर्बुद्धी झाली म्हणतो मी;चांगल्या पगाराची नोकरी आहे,सुखाने संसार चालू आहे,आणि हे काय भलतेच केले?पण मोह वाईटच हो,भल्याभल्यांची दांडी उडते,तेथे देशपांड्यांची काय कथा?”
“बिच्चारे ,फसवले गेले असणार :नाहीतर देशपांडे असे काही करणार नाहीत हो.”काही नाही हो बिच्चारे ;काही लोक असेच असतात;खालमुंडी आणि पातळ धुंडी ,म्हणतात ना,त्या प्रकारचे.”….सालसपणा,प्रामाणिकपणा,हे सर्व करतील असे वाटले वरवरचे मुखवटे…! एक दिवस येतो खरा चेहरा बाहेर.””आता पुढे काय होईल हो?”खात्यात चौकशी तर होणारच.त्यावर ठरेल पुढचे” “काही नाही होणार हो;सुटतील कि नाही बघा सही सलामत…!”पण डाग पडला तो पडला च ना?”
देंशपांड्यांच्या घरावर आयकर खात्याची धाड पडली होती.आणि इमारतीच्या आवारात इतर शेजाऱ्यांची त्यावर टीकाटिप्पणी चालू होती.
इतके दिवस सर्वतोपरी आदर्श ठरविले गेलेले देशपांडे आज सर्वांच्या नजरेतून एकदम उतरले गेले होते.कोणत्यातरी घरातून लहान मुलाच्या गाण्याचा आवाज येत होता Humpty Dumpty sat on a wall .Humpty Dumpty had a great fall .all the king ‘s men and all the king ‘s horses ,could ‘nt put Humpty Dumpty together again
किती मजेशीर बडबड गीत…! पण आज एक वेगळाच अर्थ समजला…उच्चारला गेलेला एखादाच चुकीचा शब्द,अनवधानाने झालेली लहानशी चूक,इतकासाचं न आवरता आलेला मोह,थोडेसेच दुर्लक्ष ह्या गोष्टी आयुष्यात मोठा उत्पात घडवून आणू शकतात.एका सरळ रेषेत चाललेल्या समाधानी आयुष्याचे तीन तेरा वाजवू शकतात.मेहनतीने मिळवलेले ,स्थान,जीवापाड जपलेली अब्रू,आणि कमावलेला आदर हे सर्व क्षणार्धात धुळीला मिळते.. आणि मग त्यातून सावरणे मुश्किल होऊन बसते.जखम बरी झाल्यासारखी वाटली तरी व्रण राहतोच.म्हणून सदोदित तोल सावरत जगायचे.आपला Humpty Dumpty होणार नाही ह्याची काळजी घ्यायची.
—नीला शरद ठोसर–(१/२/२०१७)

1000 chya noteche atmvrutt.

१०००च्या नोटेचे आत्मवृत्त….रात्री ९ वाजता माझा मालक बातम्या ऐकत असताना घाबरून खुर्चीवरून उठला.मग तरा तरा अंगात आल्यासारखे कपाटाचे सगळे खण उसकपासक.केले.एकुलत्या एक टेबलाचे सगळे खण धुंडाळले ..घाम फुटला होता त्याला…ते बघून त्याची बायकोही घाबरली..तिने काय झाले म्हणून विचारले,तर हा खेकसला,”बघत बसू नको वेंधळ्यासारखी.जा सगळे डबे आणि साड्यांच्या घडया शोध..पहा ५०० च्या आणि हजाराच्या नोटा आहेत का.उद्या बँकेत जमा करायला हव्यात,नाहीतर बदलून घ्यायला हव्यात,ताबडतोब.”बायकोने खूप शोधाशोध केल्यावर तिला मी सापडले.मला घेऊन ती नवर्याकडे गेली,”ही एक सापडली बघा”.दुसऱ्यादिवशी अंघोळ झाल्याबरोबर चहा घेऊन नवरा बँकेच्या लायनीत उभा राहिला.मी होते त्याच्या पाकिटात.बदलून घेणाऱ्यांची लाईन मोठी म्हणून हा जमा करणाऱ्यांच्या रांगेत उभा राहिला…दुपार झाली,उन्हात उभे राहून पाय लटपटू लागले.घेरी येऊ लागली..तरी नेटाने उभा राहिला.मला बँकेत जमा केले.ह्याच्या कडे तर फक्त ५० ची एक नोट आहे..मला माहित आहे न..!
आणि बायकोकडे असतील असेच ४०/५०..मीच काय ती तिचा आधार होते…आता ह्या दाघांचे कसे होणार ह्या चिंतेने मी व्याकुळ झाले आहे…बँकेतून पैसे काढता येणार नाहीत इतक्यात म्हणे…ते जाऊ दे आता माझे तरी भविष्यात काय होणार आहे हे मला कुठे माहित आहे…?पण आता भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे,दहशतवादाला आळा बसणार आहे.तेव्हढ्यासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे.जय भारत..!
(एका पोस्ट ने प्रेरित होऊन )
—नीला शरद ठोसर–

maza navin varshyacha sankalp

नवीन वर्षासाठी माझा संकल्प—
नवीन वर्षासाठी काहीतरी संकल्प करायचा आणि तो निश्चयाने पुरा करायचा निश्चय करायचा अशी एक प्रथा आहे.थोड्या दिवसातच तो मोडला जाणे ही सुद्धा प्रथा आहेच.पण म्हणून कोणी संकल्प करायचे थांबत नाही. मला कळायला लागल्यापासून मी सुद्धा असे संकल्प दरवर्षी करत आले.
लहानपणी रोज नियमित गृहपाठ करायचा,शाळेला उशीर करायचा नाही,लोकांच्या झाडांवर दगड मारून चिंचा,बोरे,आवळे,कैऱ्या पडायच्या नाहीत,असे संकल्प केले परंतु ते पार पडणे शक्यच झाले नाही.जरा मोठी झाल्यावर रोज एकतरी नवीन पुस्तक वाचायचे,इंग्लिशचे रोज १० नवे शब्द पाठ करायचे,आठवड्याला एक निबंध लिहायचा असे प्रकृतीला न झेपणारे संकल्प करून बसायचा गाढवपणा केल्यावर आठवड्यातच ह्या संकल्पांची वाट लागणारच ना?१० त गेल्यावर सिनेमातल्या हिरोईन सारखे सडपातळ होण्याचे ठरविले.त्यासाठी व्यायाम तर आवश्यकच….म्हणून रोज सकाळी पळायला जाण्याचा ,माझ्या मते,सुलभ असा संकल्प केला..साधारण २ आठवडे निश्चय पळाला गेला.पण मग सोडावेच लागले संकल्पावर पाणी..कधी अंग दुखणे,कधी उठायला उशीर,कधी परीक्षा,कधी सणवार ,कधी पाहुणे अशी अनेक निमित्ते झाल्यावर माझा तरी काय निभाव लागणार
ना?महाविद्यालयात जाण्याची वेळ जवळ येत चालली तसे ठरवले कि यंदा सायकल शिकायची.त्यावेळी सर्व हिरो आणि हिरोईन सायकल वरूनच कॉलेजला,सहलीला वगैरे जात.अगदी गरीब असले तरी नोकरीला सायकल ने जात.तेंव्हा नंतर पंचाईत नको व्हायला म्हणून आधीच तयारी करू या.म्हटले.दुसऱ्या दिवशी भाड्याने सायकल आणली,वडील भावाच्या हजार विनवण्या केल्या आणि पटांगणात सायकल शिकणे सुरु केले.आणि काय आश्चर्य…?साधारण महिना भरात आली कि हो सायकल चालवायला..! मग एक दिवस पूर्ण आत्मविश्वासाने त्या सिनेमातल्या हिरोईन सारखे रस्त्याने सायकल चालवायला गेले.आणि पहिल्याच वळणावर अपघात होताहोता वाचले…गुढगे आणि ढोपरे फुटाण्यावर आणि पाय मुरगळण्यावर भागले..पण वडिलांनी लगेच माझी सायकल च बंद करून टाकली.पुढे महाविद्यालयात गेल्यावर लक्ष्यात आले कि कबड्डी,खोखो.उंच उडी,लांब उडी,पाळण्याची शर्यत ह्या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याच खेळात गती नाही…इतर काही मुली टेबलं टेनिस,बॅडमिंटन ह्यांच्या रॅकेट्स हातात घेऊन कश्या भाव मारत असतात.म्हणून ठरवले,ह्या वर्षी टेबलंटेनिस शिकण्याचा संकल्प करू.आता तुम्ही विचारलं कि हाच खेळ का?तर त्याचे कारण म्हणजे सर्व साहित्य महाविद्यालयाकडूनच मिळायचे.बॅडमिंटन चा खर्च तसा परवडणारा नव्हताच.सुरवातीला चेंडू बॅट आणि टेबलं ह्यांची गाठ पडणेच मुश्किल झाले.पण मी हार थोडीच मारणार?खूप श्रम करून सर्व्हिस करायला तर शिकले.पण पुढे काहीच प्रगती नाही..म्हणजे समोरचा खेळाडू सर्व्हिस करी,मला अर्थातच ती घेता येत नसे..मग खाली पडलेला चेंडू उचलून मी सर्व्हिस केली आणि त्याने ती परत केली कि पुढे काहीच नाही ..चेंडू जमिनीवरच धाव घेई,,,कारण फक्त विरुद्ध बाजूच्या कोर्टात चेंडू कसा मारायचा हा प्रश्न पडत असे.एक मात्र खरे जमिनीवरचा चेंडू उचलून उचलून कंबर मात्र थोडी बारीक झाली..पण नंतर माझ्याबरोबर खेळायचे सर्व टाळत आहेत असे लक्ष्यात आल्यावर म्हटले आता जास्त शोभा नको..आणि दिला नाद सोडून..म्हणून पुढील वर्षी हार्मोनियम शिकायचा संकल्प सोडला.ह्यात कोणताही धोका नव्हता.शिवाय हार्मोनियम माळ्यावर पडूनच राहिलेला होता आजोबा गेल्यावर…तो साफसूफ करून क्लास ला नाव घातले.एक दोन महिने वेडे वाकडे सूर काढून झाल्यावर वडील एक दिवस म्हणाले”तू दुसरे एखादे वाद्य शिक;बुलबुलतरंग सारखे.त्याचा आवाज लहान आणि सहन करण्याजोगा असतो.मी काय समजायचे ते समजले,आणि तो संकल्प काही पुरा करता आला नाही..शिक्षण पूर्ण झाल्यावर आई म्हणाली पुरे झाले ते छंद! आता यंदा स्वयंपाक करायला शिकण्याचा संकल्प कर.पुढे कामास तरी येईल.मग रोज घराच्या लोकांना अर्धवट शिजलेला भात,चित्र विचित्र आकाराच्या कडक,कच्य्या किंवा जळक्या पोळ्या,बिन मिठाची आमटी आणि तोंड भाजणारी तिखट भाजी खायला मिळू लागली..पण आईने कंबरच कसली होती..आणि वर्ष भरात लोक खाऊ शकतील असा रोजचा स्वयंपाक मला येऊ लागला…हुश्श..इतक्या वर्षात मी पूर्ण केलेला ,म्हणजे आईनेच पूर्ण केलेला हा पहिलाच संकल्प होता.अशी ही माझी नवी वर्ष्याच्या संकल्पांची परंपरा…! नंतर मात्र मी शहाणी झाले .संकल्प करून तो सिद्धीस नेणे हे आपल्या कुवती पलीकडचे आहे हे कळून आल्यावर मी हल्ली प्रत्येक नव्या वर्ष्याच्या पहिल्या दिवशी एक अगदी अनोखा संकल्प करते आणि तो माझ्याकडून अगदी छान वर्षभर पळाला जातो.ऐकायचे आहे त्याचे गुपित?मग ऐका. .नाहीतरी आपले ज्ञान जगाला देऊन सर्वाना शहाणे करून सोडावे असे समर्थानी म्हटलेच आहे.
तर तो संकल्प म्हणजे रोज सकाळी नवीन संकल्प करायचा आणि तो दिवसभर पाळायचा..जसे कि आज दिवसभर चहा प्यायचा नाही,किंवा आज नुसता आराम करायचा,किंवा उद्या रविवार आहे तर उशिरा पर्यंत लोळत पडायचे,किंवा आज नुसता फलाहारच करायचा इत्यादी..नवा दिवस नवा संकल्प हाच नवीन वर्ष्याच्या संकल्पाचा मूलमंत्र..!कशी वाटते कल्पना?
—नीला शरद ठोसर–(३१/१२/२०१६)