DINK एक विचार

DINK–एक विचार
लग्न झाल्यावर जवळजवळ ३ वर्षांनी सौम्या माहेरी आली होती..लग्न तरी कसे म्हणायचे त्याला?खरेदी नाही,पाव्हणेरावळे नाहीत,मंत्र नाहीत म्हणून गुरुजी हि नाहीत..ती आणि तिचा भावी नवरा दिल्लीहून आले,दुसर्यादिवशी registrar च्या ऑफिसात जाऊन त्यांनी आणि साक्षीदारांनी सह्या केल्या..एकमेकांना हार घातले..त्याने हिला मंगळसूत्र घातले आणि हिने त्याला अंगठी !..झाले लग्न..लगेच दुसर्या दिवशी दोघे निघूनही गेले नोकरीच्या ठिकाणी.. आईबाबाना आवडलेच नव्हते..पण ह्या दोघांच्या हट्टापुढे त्यांचे काही चाललेच नाही..त्या नंतर आज आली होती दोघे आणि ४ दिवस रहाणार म्हणाली..त्यामुळे आई खुश होती..मागचे सगळे विसरून दोघांचे कोडकौतुक करण्यात गुंतली.
जरा निवांतपणा पाहून आईने म्हटले”सौम्या,तू खूष आहेस हे दिसतेच आहे..पण आता ३ वर्षे झाली ,आम्हाला आजी आजोबा व्हायची संधी कधी देताय तुम्ही?””आई उगीच आशेवर राहू नकोस तू..आम्ही दोघांनी मूल जन्माला घालायचे नाही असे ठरवलेय.”लेकीचे हे उद्गार ऐकून आई चमकलीच..”आता हे काय नवीन?दोघ चांगली कमावाताय..आणि सर्व व्यवस्थित असताना हे काय नवीन खूळ घेतलाय तुम्ही डोक्यात?”आई उद्वेगाने म्हणाली..”हे खूळ नाही आई..ह्याला इंग्लिश मध्ये DINK COUPLE म्हणतात.म्हणजे Double income ,no kids..खूप विचारांती हा आम्ही दोघांनी सहमतीने घेतलेला निर्णय आहे.आम्ही शेवट पर्यंत दोघेच रहाणार आहोत.”सौम्या म्हणाली.”अग का पण?कसला विचार केलाय तुम्ही?आईने असे विचारताच सौम्या म्हणाली”कारण आम्हाला आमच्या संशोधन क्षेत्रात खूप काही करायचे आहे.मूल जन्माला घातले कि ती एक मोठीच जबाबदारी घ्यावी लागेल.त्याच्या संगोपनासाठी वेळ द्यायला हवा .त्याचे दुखणेखुपणे,काढायला हवे..त्या साठी वेळच नाही आमच्याकडे..आम्ही ना त्याचे संगोपन नीट करू शकू ना आमच्या कामाकडे पूर्णवेळ निवांतपणे लक्ष देउ शकू..नंतर त्याची शाळा,त्याचा अभ्यास त्याचे शिक्षण त्याचे करिअर ह्यालाच प्राधान्य द्यावे लागेल..आणि आमच्या क्षेत्राकडे आमचे दुर्लक्ष च होईल..कदाचित मला माझ्या आवडत्या क्षेत्राला रामराम च ठोकावा लागेल…आणि माझ्या नवर्याला ते व्हायला नकोय.तुझेच उदाहरण बघ ना..आमच्या मुळे तुला तुझी नोकरी सोडावी लागली..तुला गाण्याची आवड..पण ती पूर्ण करता आली नाही..तुम्हा दोघाना खूप प्रवास करायचा होता..पण आमची शिक्षणे पूर्ण करताकरता ते शक्यच झाले नाही आणि जेंव्हा शक्य झाले तेंव्हा तुमची शरीरे तुम्हाला साथ देत नव्हती..आम्हाला हे सर्व नकोय आई…आम्ही आमच्या क्षेत्रात खूप काही करू इच्छितो,आमच्या कार्याचा समाजाला उपयोग व्हावा असे कार्य आम्हाला करायचे आहे..आम्ही दोघेही कमावतो..तो पैसा आम्ही आमच्या मुलांवर खर्च न करता समाजातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी संस्था काढणार आहोत.अशिक्षित स्त्रीयांना काम देऊन सक्षम करणार आहोत.संशोधन/क्रीडा/संगीत,नृत्य चित्र कला ही क्षेत्रे समाजातील सर्व मुलाना सहज उपलब्ध व्हावीत,पैशाविना त्याना ह्या क्षेत्रात प्रगती करण्यास अडचण पडू नये म्हणून कायम स्वरूपातील निधी तयार करणार आहोत.अनाथ वृद्ध/ अपंग/गतिमंद याना आधार देण्यासाठी संस्था काढणार आहोत आणि बरेच काही करायचे आहे..ते सर्व करायचे तर मुलाच्या जबाबदारीतून मुक्तता हवी आई “.सौम्याचे बोलणे संपल्यावर आई म्हणाली ,”आत्ता ठीक वाटतेय तुम्हाला ..पण म्हातारपणी एकटेपणा जाणवेल..एकच मागे उरला तर आणखीनच कठीण होईल..”अग आई ,इतका लांबचा विचार कशाला करतेस?तुमचेच उदाहरण घे ना..दादा तिकडे परदेशात स्थाईक झालाय आणि मी सध्या जरी दिल्लीत असले तरी नंतर असेनच असेही नाही..म्हणजे तुम्ही तसेही एकटेच आहात ना?सध्या घरोघरी हीच स्थिती आहे..आईवडिलाना एकटेच राहावे लागते आजकाल.आपली म्हातारपणाची सोय व्हावी म्हणून मुलांच्या खस्ता खात आयुष्यभर मन मारून जगायचे.आणि शेवटी एकटेपणा च पदरी घ्यायचा ना?.शिवाय मुले आपला निट सांभाळ करतील ह्याची तरी काय शाश्वती??सगळे बेभरवशाचेच.ना?”सौम्या म्हणाली.”आमच्या म्हातारपणाची सोय आम्हीच करू..आमचे छद जोपासू,प्रवास करू जगभराचा आणि समजा तू म्हणतेस तशी वेळ आलीच तर ज्यांना आम्ही आयुष्यात उभे राहण्यास मदत करू ती मुले किंवा ज्या संस्था आम्ही उभ्या करू तेथील लोक आम्हाला आहेतच की.आमच्या स्वताच्या मुलाच्या भरवशावर राहण्यापेक्षा ह्यांच्या वर भरवसा टाकून पाहू.शिवाय आजकाल वृद्धाश्रामात सुद्धा उत्तम काळजी घेतात.”तुझ्या सासरच्या मंडळीना पटतंय का हे?”आईने विचारले..”आधी नाही पटले..ते वंशाचा दिवा वगैरे असते ना?म्हणून पटत नव्हते..पण माझ्या नवर्याने त्यांची छान समजूत घातली..म्हणाला असा काय मोठा आपला प्रसिध्द वंश आहे का?कि आपली मोठी इस्टेट आहे ?आणि आम्ही मारे वंशाचा दिवा जन्माला घालू पण त्यानेच दिवे लावले तर?त्या पेक्षा समाजातील वंचित मुलेच आपली म्हणू .त्यांचे आयुष्य फुलवू. .आपल्या स्वतःच्या मुलाच्या भरवशावर राहण्यापेक्षा त्यांना आपले म्हणू.. “हळू हळू पटले त्यांना.”आई ला हे विचार नवे होते..पण तसे थोडेफार पटतही होते.
—नीला शरद ठोसर–(१९/२/२०१९)

निसर्गाची आश्चर्यचकित करणारी पर्ण निर्मिती

निसर्गाची आश्चर्य चकित करणारी पर्णनिर्मिती–
डोंगराच्या उंच पठारावरून खाली नजर टाकली कि शेतांच्या तुकड्यांवर हिरव्या रंगात नटलेल्या रांगोळ्या पाहून मन मोहून जाते. प्रत्येक शेततुकड्याची रंगछटा वेगळी..एखादा हिरवाकंच,दुसरा तर दुसरा पिवळट हिरवा ..पोपटी रंगाच्या जवळ जाणारा..त्याच्या बाजूला काळपट हिरवा आणि दुसरीकडे जाम्भळट हिरवा.एक तुकडा तर चक्क पिवळा धम्मक… मोहोरीचा असावा हा शेततुकडा.प्रत्येक शेतात लावलेल्या पिकांच्या पानाचे रंग त्या शेतांना मिळालेले असतात..
खरच,नुसती पाने पहिली तरी त्यांच्या रंगात किती वैविध्य असते.काही पानांचा रंग हिरवा गार ,तर काही पाने हिरवीच असतात पण त्याच्या हिरव्या रंगात काळाजाम्भळा रंग असा काही मस्त मिसळलेला असतो कि तो रंग कोणता म्हणावा हेच समजत नाही.अळूची/ तुळशीची पाने असतात अशी..काही झाडांची पानेही हिरवीच पण तुर्याची कोवळी पाने हिरवी कशी म्हणावी?ती तर चक्क तांबूस गुलाबी दिसतात.गुलाब ,कडुलिंब .आंबा,ह्यांना गुलाबी पानांचे तुरे असतात.पिंपळाच्या अशा कोवळ्या तांबूस पानांची ,हलक्याश्या वाऱ्याच्या झुळकेवरही होणारी तरल हालचाल मनाला विलक्षण भुरळ पाडते..लाल माठाची पाने तर तांबडी लाल असतात.. पण बदामाच्या झाडाच्या पानांची एक वेगळीच मजा आहे.ह्या झाडाची पाने हिरवी असतात,पण अगदी तांबडी लाल होई पर्यंत गळत नाहीत.तो पर्यंत हे झाड हिरव्या तांबड्या रंगात विणलेल्या नक्षीची शाल पांघरून असते.थंडी असते ना ..😃 एकदा का सगळी पाने गळून पडली कि थंडी संपली असे खुशाल समजावे.पण आश्चर्य म्हणजे काही झाडांची पाने हिरवी नसतातच..ती पिवळी धम्मक ,लाल भडक,पांढरीशुभ्र अशीही असतात..काही तर चक्क जांभळी निळी असतात..माळीदादा मग ह्या झाडांची कल्पकतेने अशी काही रचना करतात कि ते फुलांचे ताटवे आहेत असेच वाटावे उंचावरून फोटो घेतलाकी..
काही पाने एकेकटी असतात.तर बेलाच्या ३ पानांचा एक समूह असतो..गुलाबाचाही ५ किंवा ७ पानांचा समूह असतो.अळूचे एकच एक लांब देठ असलेले पान असते.तर शेवग्याला असंख्य लहानलहान पानाचे झुबके लागलेले दिसतात.कांद्याची हिरवीगार लांबच लांब नाजूक पात..पण मूळात एकत्र…सत्पर्णी वृक्षाच्या ७ पानांचा एक समूह असतो आणि असे ७ समूह एकत्र असतात एका देठावर..असे अनेक देठ एकत्र येतात..आणि त्यांचे एक झुडुपच बनते .ह्या झाडा चीही पानगळ पूर्ण झाली कि थंडी संपते..सध्या जोरात सुरु आहे ही पानगळ.. मोठ्ठा सडाच पडतो वाळक्या पानांचा .त्या वरून चालताना चुरुचुर असा मजेदार आवाज येतो.आणि रात्री इतर झाडांवर पडलेली ही पाने फुलांसारखी दिसतात.
पानातील शिरा हा आणखी एक गमतीचा भाग आहे.नारळाच्या पानात एकच एक लांब हीर असतो तर अळूच्या पानात एक मुख्य शिर आणि तिला पुढे फुटवे फुटत जातात.तिचे शेवटचे टोक तर केसा ईतके लहान झालेले असते.
पानांचा आकार हा एक वेगळाच निबंधाचा विषय होईल.येथे इतकेच म्हणेन कि गव्हाच्या दाण्या एव्हढ्या आकाराच्या पानापासून ३/४ फूट लांबीच्या पानापर्यंत आणि भूमितीतील सर्व आकाराची पाने असतात .निसर्ग एक अद्भुत कलाकार आहे आणि त्याच्या फक्त पानातील ह्या विविध कलाकृती पाहताना मन स्तिमित झाल्यावाचून रहात नाही.
—नीला शरद ठोस(४/२/२०१९)